Ujjwal Nikam about Anil Deshmukh Narkhed Attack : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नरखेड येथून प्रचारसभा आटपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली. देशमुखांवरील हल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. या हल्ल्लावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप होऊ लागले आहेत. तसेच पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उज्ज्वल निकम म्हणाले, “निश्चितच अशा प्रकारचा हल्ला होणे ही दुर्दैवी घटना आहे. हा हल्ला कोणी केला? केव्हा झाला? कसा झाला? याबाबत पोलीस तपास चालू आहे. पोलीस तपासानंतर सत्य उघडकीस येईल. परंतु, तो तपास पूर्ण होण्याआधी जी काही पत्रकबाजी चालू आहे, ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत ते गैर आहे असं मला वाटतं. तसेच हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा. या हल्ल्यामागे काहीतरी व्यक्तीगत कारण असेल हे देखील नाकारता येत नाही. पोलीस तपासानंतर दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. पोलीस तपास होईपर्यंत थोडी कळ सोसावी लागेल. परंतु, लोकसभेच्या मानाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात नेत्यांचे एकमेकांवरील हल्ले, प्रतिहल्ले, राजकीय स्टंटबाजी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणं कारणीभूत आहेत असं मला वाटतं. प्रत्येक नेत्याने संयम ठेवायला हवा”. निकम टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> Anil Deshmukh : अनिल देशमुख हल्ला प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलीस म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, “काटोलमध्ये लोकांकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. हे काही प्रवृत्तीना सहन झालं नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागलं आहे. त्यांच्या डोक्यामधून रक्त येत असल्याचं दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप ठीक आहे. मात्र, अशा प्रकारचा हल्ला करणं हे अयोग्य आहे. या घटनेचा मी निषेध करतो”.

हे ही वाचा >> Sanjay Raut : “आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना…”, अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांना संशय

खासदार सुप्रिया सुळेंकडून घटनेचा निषेध

“ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujjwal nikam remark attack on anil deshmukh nagpur assembly election 2024 asc