नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढविली. मात्र त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची विशेष सरकारी वकील पदावर राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली. आता या नियुक्तीला हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या विजय पालांडेंने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेऊन न्यायालयात या नियुक्तीला आव्हान दिले आहे. या आव्हानानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत. पण भाजपातर्फे त्यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांनी स्वतःवर आता एका पक्षाचा शिक्का मारून घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागेल किंवा त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. “माझ्यावर बळजबरी करून निवडणुकीला उभे राहण्यास भाग पाडले गेले. कसाबला फाशी देण्यात जरी माझा हात असला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपाने मला फासावर लटकविण्याचा प्रयत्न केला”, हे त्यांना समोर येऊन सांगावे लागेल. नाहीतर त्यांना भाजपाचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणे कठीण आहे.
कोण आहे विजय पालांडे?
विजय पालांडे हत्याप्रकरणात आरोपी असून २०१२ पासून तुरुंगात आहे. एप्रिल २०१२ रोजी व्यावसायिक अरुणकुमार टीक्कू (६२) यांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. तसेच चित्रपट निर्माते करणकुमार कक्कर यांच्याही हत्येप्रकरणी विजय पालांडेला आरोपी करण्यात आलेले आहे. २८ जून रोजी टीक्कू हत्येप्रकरणात सुनावणी होणार आहे.
पालांडेने आपल्या याचिकेत म्हटले की, उज्ज्वल निकम यांनी एका पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे ते त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करण्याची शक्ती आहे. आरोपींना शिक्षा देण्याच्या माध्यमातून ते पक्षाची प्रतिमा तयार करू शकतात. यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याची शक्यता आहे. हा आरोपीच्या मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असा आक्षेप याचिकेत घेतला गेला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd