Ujjwal Nikam On EVM Tampering : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीने बाजी मारत २३० हून अधिक जागा जिंकल्या. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या वाट्याला मात्र अवघ्या ४९ जागात आल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाच धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये गडबड केल्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याविरोधात महाविकास आघाडी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. अशात भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवलेले वकील उज्ज्वल निकम यांनी ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांना ईव्हीएम विरोधात न्यायालयात लढायचे असल्यास कोण कोणत्या गोष्टी लागतील याबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
वकील उज्ज्वल निकम यांनी महाविकास आघाडी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत असल्याने टीका केली आहे. ते पत्रकारांशी ईव्हीएमबाबत बोलताना म्हणाले, “संपूर्ण जगात भारतातील लोकशाही प्रबळ आहे. यावेळी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. पण याला कुठालाही कायदेशीर आधार नाही. कारण निवडणूक आयोगाने यापूर्वी ईव्हीएमच्या बाबतीत काही चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर घेण्यात आल्या होत्या. आज महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे याचे भांडवल करणे, सामान्य लोकांची दिशाभूल करणे लोकशाहीमध्ये योग्य नाही. असे असले तरी याविरोधात त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येऊ शकते. पण सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ईव्हीएमध्ये कशाप्रकारे गडबड झाली हे सांगणारे १० प्राथमिक पुरावे द्यावे लगातील. आमचा अंदाज आहे, आम्हाला शंका आहे या आधारावर सर्वोच्च न्यायालयात कोणतीही गोष्ट टिकू शकत नाही.”
लोकसभा निवडणुकीत निकमांचा पराभव
दरम्यान सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वकील उज्ज्वल निकम भाजपाकडून मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लढले होते. या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांचे आव्हान होते. मात्र, यात निकम यांना यश आले नाही.
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. निकालाच्या दिवशी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये उज्ज्वल निकमांनी मोठी आघाडी घेतल्याने ते जिंकतील असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत होता. मात्र, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाडांनी निकमांची आघाडी मोडून काढत विजय मिळवला.