Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून खटल्याच्या सुरू असलेल्या खटल्यात, बुधवारी बीड मकोका न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिला युक्तिवाद केला. या युक्तीवादात निकम यांनी खटल्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकणारे महत्त्वाचे पुरावे सादर केले. याचबरोबर सुनावनीनंतर पत्रकारांशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा या दोन गोष्टींवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

या सुनावनीसाठी बीडच्या मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जहर करण्यात आले. यावेळी युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्येच्या सर्व घटनांचा तपशील न्यायालयासमोर मांडला. या सुनावनीस आरोपींचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे आणि आनंत तिडकेही उपस्थित होते. उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्येतील वाल्मिक कराडच्या सहभागाचा आणि खंडणी प्रकरणाचा संबंध न्यायालयासमोर स्पष्ट केला. आता न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी घेणार आहे.

सुनावनीनंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड न्यायालयात झालेल्या सुनावनीनंतर पत्रकारांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, “हा खटला प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्षदर्शी आणि दुसरी गोष्ट परिस्थितीजन्य पुरावे. मनुष्य खोटं बोलू शकतो, पण परिस्थिती कधीही खोटं बोलत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने एसआयटीने केलेला तपास आणि पुरावे अत्यंत चांगले आहेत.”

दरम्यान आजच्या सुनावनी वेळी युक्तीवाद करताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देषमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीचे खंडणी प्रकरणाच्या घटनाक्रमाची माहितीही न्यायालयासमोर सादर केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच होते. त्यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यात आला असून, सर्व आरोपींविरोधात खंडणीत आडवे आल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात सीआयडी आणि एसआयटी सक्रियपणे काम करत आहेत. या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे.