निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आगामी काळात काय-काय गोष्टी बदलणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत. असे असतानाच कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर महत्त्वाचे विधान केले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

चार ते पाच दिवसांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो

“निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. या निर्णयाचे काय परिणाम होणार, या निर्णयाचा फायदा तसेच तोटा किती झाला, हे काळच ठरवेल. सर्वोच्च न्यायालय कदाचित आगामी चार ते पाच दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. कारण आता या खटल्याची सलग सुनावणी होणार आहे,” असे उल्हास बापट म्हणाले.

हेही वाचा >>> “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली

“सध्याचे पाच सदस्यीय घटनापीठ आमदारांच्या अपात्रतेचा तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचा खटला कोणत्याही क्षणी सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याचाही निर्णय घेऊ शकते. विद्यमान पाच सदस्यीय घटनापीठाने तसा निर्णय घेतला, तर हा खठला वर्षभर चालेल. मात्र सध्याच्याच पाच न्यायमूर्तींनी या खटल्यावर निकाल दिला आणि तो निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात लागला, तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदरच हा निर्णय देऊन गंभीर चूक केली आहे,” असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhas bapat comment on election commission decision on shiv sena party bow and arrow symbol ownership prd
Show comments