रत्नागिरीत दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या उल्हास खैरे दाम्पत्याने नागपूरच्या मिहान आणि आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने मालमत्ता जमा केली असून शेअर बाजारात गुंतवणूक करून रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांना गंडवल्याचे किस्से आता उघड होऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत त्याचे दिल्ली, द्वारका या ठिकाणी आलिशान फ्लॅट असून गोवा येथे आलिशान कोठी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या या सर्व मालमत्तेचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
नागपुरातील महाठक दाम्पत्याने गुंतवणूकदारांना गंडविण्याची अलीकडच्या काळात उघडकीस आलेली ही तिसरी घटना आहे. जयंत आणि वर्षां झामरे या दाम्पत्याची ठकबाजी उघडकीस येऊनही त्यांच्याविरुद्ध खूप उशिराने कारवाई करण्यात आली. सध्या हे दाम्पत्य तुरुंगात असून गुंतवणूकदार मात्र हात चोळत बसले आहेत. यानंतर नागपुरातील आणखी एक महिला मोठय़ा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून गोळा केलेले पैसे घेऊन फरार झाली आहे. तिचा शोध सुरू आहे.
महाठक उल्हास खैरेविषयीची अधिक माहिती गोळा करण्याचे काम तपास यंत्रणांनी सुरू केले आहे. उल्हास शिकत होता त्या नागपुरातील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उल्हास खैरेच्या छायाचित्रांची पडताळणी केली. दिल्ली क्राइम ब्रँचचे पथक तीन वेळा नागपुरात त्याने केलेल्या घोटाळ्याच्या तपासासाठी येऊन गेल्यानंतर त्याच्या ठकबाजीचे आणखी किस्से उघडकीस आले. प्राध्यापकांनी त्याच्याबद्दल माहिती मागितली असता त्याने केलेल्या घोळामुळे तपास पथकाला त्याच्याविषयी नेमकी माहिती मिळाली नाही. त्याची छायचित्रे प्राध्यापकाला दाखविण्यात आली असता गोव्यात काढलेल्या छायाचित्रावरून उल्हास खैरे याला प्राध्यापकांनी ओळखले.
उल्हास खैरे हा उच्चशिक्षित कुटुंबातील असून तो १९९५ मध्ये एका महाविद्यालयात शिकत होता. नंतर त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. २००३ मध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर तो नागपुरातून फरार झाला. उल्हास खैरे आणि त्याची पत्नी रक्षा खैरे यांनी आपली नावे बदलून वेगवेगळ्या शहरात हे दाम्पत्य वावरत होते. आलिशान वाहनेसुद्धा त्यांच्याकडे मिळाली. देशातील २ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करून अनेकांना गंडा घातला.
 लुबाडणुकीची रक्कम वाढत गेल्याने दिल्ली पोलिसांनी तो नागपुरातीलच असल्याने त्याच्याविषयीची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात गेले. परंतु पथकाला यश आले नाही तेव्हा त्याची गोव्यातील छायाचित्रावरून त्याची ओळख पटली आणि हाच तो उल्हास खैरे असल्याची खात्री पटली.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका पार्टीसाठी ४० लाख
महाठक झामरे दाम्पत्यापेक्षा खैरे दाम्पत्य हे एका पार्टीसाठी ४० लाख रुपये खर्च करीत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या पथकाने महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दिली होती. झामरे दाम्पत्याचीही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गुन्हेगारी कार्यपद्धती पार्टी हीच होती. लाखो रुपये पाटर्य़ावर उधळून लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडणे आणि त्यांचा विश्वास संपादल्यानंतर रकमा घेऊन फरार होणे, अशा पद्धतीने त्यांनी कोटय़वधींची माया गोळा केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhas khiare cheated poeple of nagpur