वर्धा : वर्धा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर रोठा या गावात गेल्या सात वर्षांपासून ‘उमेद’ हा प्रकल्प राबवला जात आहे. मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांचा सांभाळ करण्याचे व्रत याच गावचे रहिवासी असलेले मंगेशी मून यांनी हाती घेतले आहे. अजिबात शिक्षण वाट्याला न आलेल्या अनाथ मुलांसाठी आणि आईवडिलांनीच पोट भरण्यासाठी भिकेच्या मार्गाला लावलेल्या मुलांसाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. पारधी समाज समाजाच्या मूळ प्रवाहात येऊ इच्छित असला तरीही त्यांना समाजाकडूनच नाकारले जाते हे चित्र अजूनही ठळकपणे दिसून येते. आजही अशा वंचित समूहांचे, आदिवासींचे पाडे शहराच्या किंवा गावाच्या बाहेर लोकवस्तीपासून दूर कुठेतरी असतात. विशेषत: पारधी समाजासारख्या काही समुदायांवरील गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. अशा मुलांना शोधून त्यांच्या हातात पाटी-पेन्सिल देण्याचा ध्यास उमेदने घेतला आहे.

हेही वाचा >>> Puja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सरकारी सेवेतून बरखास्त; केंद्र सरकारची मोठी कारवाई

या मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम ‘उमेद’ प्रकल्पात केले जाते. येथे केवळ त्यांच्या शिक्षणाचीच नाही तर त्यांच्या एकूणच संगोपनाची जबाबदारी घेतली जाते. शिक्षणाच्या अभावामुळे, भीक मागण्यासाठीच मुलांचा जन्म ही मानसिकता अद्यापही या समाजात मोठ्या प्रमाणात कायम आहे. त्यामुळे नवी पिढी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अजूनही वंचित असल्याचे दिसल्यावर रोठा येथील निवासी असलेल्या मंगेशी मून यांनी या मुलांचा सांभाळ करण्याचे व्रत घेतले आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी त्या सातत्याने समाजाला मदतीचे आवाहन करत असतात. त्याला प्रतिसादही मिळतो, पण तो पुरेसा नाही. विविध अडचणी ‘आ’ वाचून उभ्या आहेत. वेशीबाहेरील या मुलांना शाळेत प्रवेश द्यायलाही कोणी तयार नसताना मून यांनी धडपड करत त्यांना शाळेची पायरी दाखविली. कधीकाळी हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरणारी मुलेमुली या प्रकल्पात आल्यावर पाटीवर अक्षरे गिरवायला शिकली. भीक मागण्यापलीकडेही आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवता येते, हे त्यांना येथे आल्यानंतर कळले. त्यासाठीच या संस्थेला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.