देशभरात सध्या स्वच्छ भारत योजनेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. टीव्ही वाहिन्यांवर स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या जात आहेत. उघडय़ावर शौचास बसू नका, असे आवाहन केले जात आहे. मात्र रायगड जिल्हा याला अपवाद आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रायगड जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार १८५ कुटुंबांपकी सुमारे एक लाख कुटुंबे आजही उघडय़ावर शौचास बसत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर वाढावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेप्रमाणे २६ लाख ३४ हजार २०० इतकी आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीत ४ लाख ७ हजार १८५ कुटुंबे आहेत, यापकी २ लाख ६८ हजार ४२८ कुटुंबे वैयक्तिक शौचालयांचा वापर करतात. म्हणजे सुमारे ६६ टक्के कुटुंबे वैयक्तिक शौचालयांचा वापर करीत आहेत. उर्वरित १ लाख ३८ हजार ७५७ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा नाही. यापकी सुमारे ४० हजार कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असले तरी उर्वरित एक लाख कुटुंबे ही उघडय़ावर शौचास बसत असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीचे अभियान राबविले जाते. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन अनुदान देते. २ ऑक्टोबर २०१४ पासून या अनुदानात वाढ झाली असून ते १२ हजार रुपये करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात ८२२ ग्रामपंचायती असून सन २०१३-१४ या वर्षांपर्यंत ३६७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणे बाकी आहेत. त्यापकी १४१ ग्रामपंचायतींचे केंद्रीय समितीने परीक्षण केले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ही विदारक असली तरी जिल्ह्यातील काही नगरपालिका हद्दीमध्ये उघडय़ावर शौचास बसणाऱ्याची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. समुद्रकिनाऱ्यांचा यासाठी सर्रास वापर होताना दिसतो आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर वाढावा यासाठी जनजागृतीची गरज आहे.
‘अस्वच्छ’ रायगड
देशभरात सध्या स्वच्छ भारत योजनेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे. टीव्ही वाहिन्यांवर स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या जात आहेत.
First published on: 11-12-2014 at 05:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unclean raigad