विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना गुंतवणुकीसाठी अलिबागची भुरळ पडली आहे. त्यामुळे देशी-विदेशी बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडून अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पामुळे आगामी काळात येथील नागरी सुविधांवरील ताण वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहरलेला निसर्ग आणि सुंदर समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अलिबागला अनियंत्रित शहरीकरणामुळे बकालीकरणाचा धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांचा वाढता ओघ, अनेक वलयांकित व्यक्तींची निवासस्थाने, विविध बांधकाम कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेले विकास प्रकल्प यांमुळे निसर्गरम्य अलिबाग भविष्यात बकाल होण्याचा धोका आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’नी स्थानिकांशी चर्चा करून या परिसरासाठी विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबईपासून अगदी जवळ असल्याने अनेक पर्यटक साप्ताहिक सुट्टीमध्ये मौजमजा करण्यासाठी अलिबागलाचा पसंती देतात. बॉलीवूड तारा-तारके, बडे उद्योजक, क्रिकेटपटू यांसह अनेक धनाढ्य व्यक्तींनी अलिबागमध्ये बंगले खरेदी केले आहेत. त्यामुळे देशी-विदेशी बांधकाम व्यावसायिक कंपन्यांकडून अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी केली जात आहे.

या कंपन्यांच्या बड्या प्रकल्पामुळे आगामी काळात येथील नागरी सुविधांवरील ताण वाढणार आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, उद्याने, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांचे प्रश्न गंभीर निर्माण होणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर पुढील २० वर्षांत होणाऱ्या बदलांचा अंदाज घेऊन नागरी सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

अलिबागमध्ये कोणते मोठे प्रकल्प

दुबईतील बुर्ज खलिफा इमारत उभारणाऱ्या ईमार कंपनीने अलिबागमध्ये २५ एकर परिसरात ८४ आलिशान बंगले उभारण्याची घोषणा. ज्या बंगल्यांची किंमत ९ ते १५ कोटींच्या आसपास.

मुंबईतील ओबेराय रियालिटी कंपनीकडून अलिबाग तालुक्यातील टेकाळी गावात ८१ एकर जागा खरेदी. ज्यात पंचतारांकित हॉटेल आणि आलिशान बंगल्यांची उभारणी करणार.

लोढा समूहाकडून मांडवा परिसरात १०० एकरवर टाऊनशिप प्रकल्प उभारण्याची घोषणा.

हिरानंदानी समूहाने नागाव येथे, समिरा, महिद्रा समूहाने या परिसरात गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जागा खरेदी केली.

हॉटेल व्यावसायिक रणजीर सिंग बिंद्रा यांनी अलिबाग शहरात समुद्रकिनारी दहा मजली हॉटेल प्रकल्पाची तयारी सुरू केली.

नागरी समस्या

अलिबाग परिसराला पाण्याच्या स्वतःचा स्रोत नाही. त्यामुळे एमआयडीसीकडून होणाऱ्या पाण्यावर सध्या या परिसरातील अनेक गावांना अवलंबून राहावे लागत आहे.

अलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. अलिबाग-विरार बहुउद्देशील मार्गिकेचे काम पहिल्या टप्प्यात पनवेलपर्यंतच होणार आहे.

सागरी मार्ग, आणि ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. रेल्वे सेवेचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.

अलिबाग शहरासह तालुक्यातील गावांत क्षेपणभूमी उपलब्ध नाही.

जिल्हा रुग्णालयाचा अपवाद सोडला तर तालुक्यात मोठे रुग्णालय उपलब्ध नाही.

अलिबागसाठी विकास आराखडा तयार व्हायला हवा, त्यासाठी लागेल ते तांत्रिक सहकार्य एमएमआरडीएला देण्याची तयारी आहे. ‘झोनल प्लॅन’ असेल तर विकासाला योग्य दिशा मिळेल. अन्यथा, जमीन विकली जाईल आणि एकसंध नियोजन न होता असंख्य बेकायदा बांधकामे होतील.

पिनाकीन पटेल, आर्किटेक्ट

कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण हवे, राज्यातील इतर भागांचे नियम येथे लावणे योग्य नाही. ज्याप्रमाणे सिडको एखादे शहर वसवताना आधी रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन सुविधा आधी निर्माण करते, नंतर तिथे घरांची उभारणी होते. तोच निकष इथेही पाळला जायला हवा,

महेश चव्हाण, स्थापत्य अभियंता