सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बार्शी तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे २२ अर्ज दाखल करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. यात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये दर्शविण्यात आलेली बँक खाती चक्क उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व अन्य राज्यांतील असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी तालुका पंचायत समिती कार्यालयातील ग्रामीण महिला व बाल विकास अधिकारी रेशमा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ८५ हजार अर्ज ऑनलाइन पोर्टलवर भरण्यात आले असून त्यात अर्जांची पडताळणी होऊन बहुसंख्य अर्ज मंजूर झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांप्रमाणे योजनेचा लाभ दिला जात आहे.
प्राप्त अर्जांची पडताळणी केली असता २२ अर्जांमध्ये रहिवासी नाव, आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र या जोडलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या उणिवा आढळून आल्या. त्यांची पडताळणी केली असता त्यात आधार कार्ड व अन्य कागदपत्रे बनावट असल्याचे चौकशीत दिसून आले. संबंधित अर्जदारांच्या नावाने नमूद महिला अस्तित्वात नसल्याचे समोर आले. अर्जासोबत दर्शवण्यात आलेले बँक खाते उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व अन्य राज्यातील असल्याचा प्रकारही आढळून आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरमार्गाने लाभ मिळविण्याच्या हेतूने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शासनाची दिशाभूल व फसवणूक करून शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर २२ अर्ज भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd