-संदीप आचार्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही काळात राजकीय व्यक्तींकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांच्या तोंडाला आवार घालण्याची मागणी होत असते. त्यावर कोण उपाययोजना करू शकेल याची कल्पना नाही, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या मौखिक आरोग्यावर काम करण्याचा संकल्प केला आहे. तंबाखू आदी सेवनामुळे तोंडाच्या होणाऱ्या कर्करोगापासून मौखिक आजारांच्या विविध प्रकारांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात हे लक्षात घेऊन उपमुख्यंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील ३६ जिल्ह्यात ‘स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान’ राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्याच्या विविध संकल्पना राबिवल्या होत्या. यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पनेपासून अनेक आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश होता. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र संकल्पनेत तेव्हा जवळपास १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याशिवाय जन्मजात ऐकण्याचे दोष असलेल्या लहान मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेचा मोठा उपक्रम राबविण्यात आला होता. २०१७ मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या मौखिक आरोग्यावर काम करण्याच्या सूचना आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या होत्या. अनेक मोठे आजार होण्यामागे मौखिक आरोग्याची योग्य जपणूक न करणे हे महत्त्वाचे कारण असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मौखिक आरोग्याचे अभियान राबविण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार येत्या प्रजासत्ताकदिनापासून म्हणजे २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मौखिक आरोग्यावर उपचार करण्यात येतात, तसेच शासकीय, पालिका तसेच खाजगी दंत महाविद्यालयांच्या माध्यमातूनही मौखिक समस्येवर उपचार केले जातात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातील २,०४,९१६ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी तसेच उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे शासकीय व निमशासकीय दंत महाविद्यालयातही वर्षाकाठी हजारो लोकांच्या मौखिक समस्येवर उपचार करण्यात येतात. तथापि व्यापक स्वरुपात याची शास्त्रशुद्ध आकडेवारी आजारानुसार उपलब्ध होणे. त्याचे वर्गीकरण करून कोणत्या मौखिक आजाराला आगामी काळात प्राधान्य देऊन महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी उपचार उपलब्ध करून द्यायचे याचे धोरण निश्चित होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्यांच्या मौखिक आरोग्याची योग्य व नियमित तपासणी करण्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले.

धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. दर्शन दक्षीणदास यांची नियुक्ती –

यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दर्शन दक्षीणदास यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. याबाबत डॉ दर्शन यांना विचारले असता ते म्हणाले, जानेवारीपासून शिबीरे आणि प्रसार अशा दोन टप्प्यात राज्यात हे अभियान राबविले जाणार आहे. काही लाख लोकांच्या मौखिक आरोग्याचा यात शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाची दंत वैद्यकीय महाविद्यालये तसेच महापालिकांची दंत महाविद्यालये तसेच नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ आदींच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठीच्या समितीमध्ये आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक, आरोग्य विभागाच्या संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आम्ही पोस्टर व व्हिडिओ तयार करणार –

आदिवासी विभाग, शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग तसेच महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून व सहकार्यातून ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार असून पहिल्या सहा महिन्यांमध्ये लाखाहून अधिक लोक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याचा अभ्यास केला जाईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने मौखिक आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यायची याची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आम्ही पोस्टर व व्हिडिओ तयार करणार असून अत्यंत सोप्या पद्धतीने दात स्वच्छ कसे करायचे व तोंडाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगितले जाईल, असे डॉ. दर्शन म्हणाले.

अभियानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार –

सहा महिन्यांच्या सखोल सर्वेक्षणानंतर या मौखिक आरोग्य अभियानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून महत्त्वाच्या महागड्या उपचाराचा भार गोरगरीब रुग्णांवर येऊ नये, यासाठी यातील काही निवडक आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मौखिक आरोग्य हा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातही लहान मुलांचे मौखिक व दंत आरोग्य जपणे ही काळाची गरज असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under the concept of deputy chief minister devendra fadnavis the clean oral health campaign will be implemented across the state msr