भाजपा किंवा शिवसेना असेल इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते आहे त्यावर काहीही कारवाई होत नाही हे दुर्दैवी आहे असं माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. भाजपाच्याच कार्यकर्त्याला मारहाण होते आणि कारवाई होत नाही याला काय म्हणायचं? पोलिसांवर इतका दबाव कुणाचा आहे? ५५ लोकं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत असं वाटायचं की भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तर केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी वगैरे पडतील का? पण आता तर ही भीतीच राहिलेली नाही. गृहमंत्री स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना सांभाळू शकत नसतील, हल्ल्यांपासून वाचवू शकत नसतील तर नागरिकांनी करायचं काय? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. काही वेळातच ठाकरे कुटुंब ठाण्यात हल्ला झालेल्या रोशनी शिंदेंची भेट घेणार आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे यांनी आणखी काय म्हटलं आहे?

“ठाण्यात गद्दार लोकं राहतात. गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक काढली गेली होती. अशा लोकांवर कारवाई का होत नाही? कोणीही येऊन बायकांना शिव्या देतात. सुषमाताईंना परवा ज्या शब्दांमध्ये गद्दार आमदार बोलले होते तसंच सुप्रियाताईंना एक गद्दार मंत्री बोलले. कुठेही कारवाई झाली नाही. कारवाई सोडा काही समजही दिली जात नाही. राज्यात नेमकं चाललंय काय आणि गृहखातं कुणाच्या दबावाखाली काम करतंय हा एक मोठा प्रश्नच आहे” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

या लोकांना धास्ती आहे पण जेव्हा तुम्ही राज्यकर्त्यांच्या खुर्चीत बसता तेव्हा राज्यकर्ते म्हणून काम करणं अपेक्षित असतं. आत्ता राज्यात सगळा अंधाधुंद कारभार चालला आहे हेच दिसतं आहे. हे सगळं चाललेलं असताना पडद्याआड दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल तर मुंबई महापालिकेत अनेक भ्रष्टाचार समोर येत आहेत. अशा किती महापालिका असतील? निवडणुका न होऊ देणं, आता एक वर्ष होऊन गेलं तरीही निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. महापालिकेत मुंबईकरांचा पैसा कुठे जातो आहे?याचा विचार होण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही खरंतर शिवसेनेची संकल्पना होती. मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. उद्घाटन यांनी केली आणि फोटो स्वतःचे लावले. तरीही औषधांचा तुटवडा जाणवतोच आहे.उत्पादक आणि वितरकांच्या वादामुळे औषधं कमी पडत आहेत. कारभार करायचा कसा हे माहित नाही. तसंच कोस्टल रोडलाही विलंब लागतो आहे. अनेक कामांना विलंब लागतोय महाराष्ट्रात असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under whose pressure is the ministry of home affairs in maharashtra working asks aditya thackeray scj
Show comments