मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व विनयभंग केल्याप्रकरणी तुळजापूरच्या नगराध्यक्ष विद्या गंगणे यांचा मुलगा विष्णू यास पोलिसांनी अटक केली. दलित अत्याचार प्रतिबंधक व बाल लंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
तुळजापूर येथील विष्णू गंगणे हा शहरातीलच या १५ वर्षीय मुलीची दोन महिन्यांपासून रस्त्यात अडवून छेड काढत होता. ‘तू मला नेहमी फोन कर, अन्यथा तुझ्या भावाला जिवे मारीन,’ अशी धमकी तो देत होता. त्यास घाबरून या मुलीने सोमवारी कॉइन बॉक्सवरून गंगणे याला दूरध्वनी केला. तेथे येऊन त्याने मुलीस गाडीत जबरदस्तीने बसवून अपहरणाचा प्रयत्न केला. तिला तुळजापूरजवळ मुदग्लेश्वर मंदिर परिसरात नेऊन बळजबरीचा प्रयत्न केला. तिने सुटका करवून घेत बचाव केला. मुलगी पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर गंगणे याने तेथून पोबारा केला.
सायंकाळी उशिरा ही मुलगी घरी गेली व तिने घडलेला प्रकार मामाला सांगितला. त्यानुसार तिच्या मामाने तुळजापूर पोलिसात सोमवारी रात्री फिर्याद दिली. या प्रकरणी गंगणेविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून गजाआड केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे यांनी सांगितले. आरोपी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा विद्या गंगणे यांचा मुलगा आहे.

Story img Loader