आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत रंगणार आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला. हा तिढा सुटल्यावर जागा वाटप केलं जाईल. त्यामुळे कोणाला किती जागा मिळतात याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मी जिथं उमेदवार जाहीर करेन, तिथं मीच उभा आहेस असं समजून मतदान करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आज ते बारामतीत बोलत होते.
“माझी तुम्हाला विनंती आहे की लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे. त्या निवडणुकीत तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर बारामतीत जो बदल आणि जे काही काम चाललं आहे, जे निर्णय मी विकासासाठी घेतले ते लक्षात ठेवा. धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
हेही वाचा >> “मी आजपर्यंत कधीही काही मागितलेलं नाही..”, अजित पवार यांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन
ते पुढे म्हणाले, “उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन, तिथे मी उभा आहे (अजित पवार) असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. पण, तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“आपल्या कामांचा वेग असाच राहण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन सहकार्य करावं. आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करा. तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील, नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो”, असंही अजित पवार म्हणाले. “आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीत आर्थिक सुबत्ता कशी नांदेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसाठी आम्ही सगळेचजण जिवाचं रान करुन काम करता आहेत”, असंही अजित पवार म्हणाले.