राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ६८ बेरोजगारांना सुमारे ४० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या संशयितांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी विशाल देवठाण या तरुणाने तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी संदीप सावंत व त्याचा साथीदार रामलाल यादव हे विशालच्या घरी आले होते. त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावून देण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे घेऊन काही दिवसांनी संशयितांनी बँकेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन विश्वास संपादन केला. नोकरी मिळाल्याने आनंदित झालेल्या विशालने ही बाब मित्रांना सांगितली. त्यांनीही मग संशयितांकडे धाव घेऊन नोकरीसाठी पैसे दिले. जवळपास ६८ बेरोजगारांकडून प्रत्येकी ६० हजार याप्रमाणे सुमारे ३९ लाखांची रक्कम सावंत व यादवने उकळली. बरीच प्रतीक्षा करूनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार युवकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विशालचे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधिताने आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी यादव व सावंत यांना अटक केली. शनिवारी संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या प्रकरणातील संशयित सावंत यानेही आपणास द्वारका येथे डांबून ठेवत मारहाण केल्याची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेरोजगारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ६८ बेरोजगारांना सुमारे ४० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली.
First published on: 21-07-2013 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployed misled two sent in police custody