राज्यात तीन पक्षाचं सरकार सत्तेवर आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपाच्या आमदारांना समान निधी दिला जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच, विरोधी पक्षातील आमदारांनाही कमी निधी दिला जातो असा आरोप सातत्याने केला जातो. आता राष्ट्रवादीतील आमदार जयंत पाटील यांनीही असाच गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ तारखेपासून सुरू होत आहे. आम्ही ६ डिसेंबरला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची बैठक घेणार आहोत. अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर या बैठकीत चर्चा होईल, असं जयंत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध मुद्दे, निधीचं असमान वाटप याविरोधात आवाज उठवला जाईल. हाजिर तो वजिर अशी परिस्थिती सरकारची आहे. जो मंत्रालयात जातो, ठाण मांडून बसतो तोच जास्त पैसे घेतो. सत्तारूढ आमदारालाही १०० कोटी, कोणाला ३०० कोटी तर कोणाला ५० कोटीच मिळाले आहेत. म्हणजेच, सत्तेत असणाऱ्यांनाही निधीचं समान वाटप होत नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. हा मुद्दा आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा >> “आरक्षणाबाबत मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही, हे सर्व ठरवून…”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “दोन व्यासपीठ…”
ट्रॅक्टर रॅली काढणार
“राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भात तुरीच्या पिकांचे, नंदुरबारमध्ये मिरचीचे तर जळगाव व नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे जनावरांचेदेखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याची अंमलबजावणी होईल असे वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा व ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. उद्या गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी जळगाव, शुक्रवार १ डिसेंबर रोजी नाशिकच्या दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल व राज्य स्तरावरील पक्षाचे महत्वाचे नेते त्यात सहभागी होतील”, अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.