सातारा : किल्ले प्रतापगडाला ‘युनेस्को’च्या पथकाने भेट दिली. या पथकाने किल्ल्यावरील दरवाजा, मुख्य बुरुज, चोरवाटा, तलाव, मंदिर तटबंदी व अन्य संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. साडेतीनशे वर्षांनंतरही प्रतापगडाची योग्य ती जपणूक केल्याबद्दल, तसेच सण-उत्सवाची परंपरा अबाधित ठेवल्याबद्दल युनेस्कोच्या पथकाने सेवेकऱ्यांचे भरभरून कौतुकही केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील अकरा व तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळ यादीत करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारने ‘युनेस्को’ला पाठविला आहे. या यादीत किल्ले प्रतापगडाचा समावेश आहे. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी ‘युनेस्को’चे पथक पुणे जिल्ह्याचा दौरा आटोपून साताऱ्यात आले. सकाळी हे पथक किल्ल्यावर दाखल झाले. या वेळी दिल्ली व महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पथकाने बारकाईने पाहणी करताना माहितीही जाणून घेतली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी स्थानिक किल्लेदार, पालखीचे भोई, मंदिराचे सेवेकरी, तसेच तरुणांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्नही विचारले. या प्रश्नांना सर्वांनी समर्पक उत्तरे दिली. येथील तरुणांना कसण्यासाठी शेती नाही. त्यांची रोजी-रोटी पर्यटनावर अवलंबून आहे. या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळात समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या गड-इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल. किल्ल्यावर पर्यटन वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील. त्यामुळे किल्ल्याचा वारसास्थळ यादीत समावेश करावा, अशी मागणी तरुणांनी ‘युनेस्को’कडे केली. साडेतीनशे वर्षांनंतरही भक्कम असलेली किल्ल्याची तटबंदी, तसेच सेवेकऱ्यांनी अबाधित ठेवलेली सण-उत्सवाची परंपरा याचे ‘युनेस्को’च्या पथकाने कौतुक केले. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली अफझल खान कबर आणि परिसराची देखील या पथकाने पाहणी केली.

हे ही वाचा…बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न बार्शीत २२ प्रकार उजेडात; बँक खातेही परराज्यातील

प्रतापगडाचा दौरा आटोपून या पथकाने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची पाहणी केली. वाघनखांच्या दालनालाही या पथकाने भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुरातत्त्व विभागाचे संचालक सुचितकुमार ओगले, उपसंचालक हेमंत दळवी, संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unesco team appreciated servants for preservation of pratapgad and tradition of festivals sud 02