CM Devendra Fadnavis on Aurangzebs Grave: मुघल शासक औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. मागच्या आठवड्यात हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याची तयारीही केली होती. मात्र राज्य सरकारने मोठा फौजफाटा कबरीच्या ठिकाणी तैनात करून प्रतिबंधक कारवाई केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. दुर्दैवाने सरकारला या कबरीचे संरक्षण करावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले.
औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होऊ देणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात बोलत असताना फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले, या देशात महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही. खरंतर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्रात कशाला हवी? असा प्रश्न पडेल. पण आपल्याला कल्पना आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या कबरीला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. म्हणून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, दुर्दैवाने त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पण यानिमित्ताने एक वचन देतो. काहीही झाले तरी या महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. जर उदात्तीकरण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याचा प्रयत्न चिरडून टाकण्याचे काम आम्ही करू.
खासदार उदयनराजेंनी केली होती मागणी
खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वात आधी औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, असे म्हटले होते. “औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत. हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे”, असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.
औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला योग्य तो रस्ता दाखवावा. इतिहासकारांच्या अभ्यासातूनच योग्य काय, अयोग्य काय हे ठरेल. प्रत्येकाची आस्था वेगळी असते. राज्य सरकारने या सर्वांच्या आस्थेचा आदर करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (१६ मार्च) मांडली.