यंदाच्या वर्षी भाताच्या आधारभूत किमतीत अंशत: वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत रायगडमधील पंधरा तालुक्यांत २२ ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत. याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ए ग्रेड भाताला या वर्षी १ हजार ३४५ रुपये प्रति क्विंटल असा दर दिला जाणार आहे. तर सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल १ हजार ३१० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा किंचित जास्त आहे. गेल्या वर्षी ए ग्रेड भाताला प्रति क्विंटल १ हजार २८० तर सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल १ हजार २५० असा दर मिळाला होता. मात्र या वर्षी पीक परिस्थिती, पैसेवारी, पिकाचे सरासरी उत्पादन आणि लागवडीखालील क्षेत्र लक्षात घेऊन ही दरनिश्चिती करण्यात आली आहे.     रायगड जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत लवकरच या भात खरेदी केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. मात्र भात खरेदी केंद्रावर भात घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी सोबत सातबारा उताऱ्याची प्रत आणणे आवश्यक असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारतभूूषण पाटील यांनी सांगितले आहे. या वर्षी भातामध्ये आद्र्रतेचे प्रमाण १७ टक्के एवढे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भात खरेदी करताना आद्र्रतेचे प्रमाण लक्षात घेऊनच भात खरेदी केली जाणार आहे. बुरशीयुक्त अथवा ओल आलेला भात खरेदी केला जाणार नाही यांची शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.      रायगड जिल्ह्य़ात या वर्षी भाताच्या उत्पादनात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आधारभूत किमतीत झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे.

Story img Loader