भाजपाला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या प्रचार सभेत केलं होतं. १३ नोव्हेंबरच्या दिवशी अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनीही मध्य प्रदेशच काय देशातल्या सगळ्या नागरिकांना रामभक्तांना रामाचं मोफत दर्शन भाजपाने घडवलं पाहिजे अशी मागणी केली. राज ठाकरेंना या वक्तव्याबाबत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरेंनी आपल्या शैलीत अमित शाह आणि भाजपाला टोला लगावला.
अमित शाह यांनी काय आश्वासन दिलं?
मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शाह म्हणाले, “तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल.”
राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
“मला वाटतं भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली? ते लोकांना सांगा ना. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवत आहात? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात तर काय कामं केली ते सांगा.” असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपा आणि अमित शाह यांना टोला लगावला आहे.
विश्वचषक भारताने जिंकणं हे लोकसभेच्या रणनीतीचा भाग आहे का? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले “छे हो, अहो चंद्रयान विसरले लोक. विश्वचषक कसा लक्षात ठेवतील? लोकसभा निवडणुकींना अद्याप अवकाश आहे. तोपर्यंत वर्ल्डकप वगैरे विसरतील लोक.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.