लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाचं काय होणार? हा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या जागांपैकी कोण किती जागा लढवणार? हे अद्यापही ठरलेलं नाही. अशात केसाने गळा कापू नका असं रामदास कदम यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावलं आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही भूमिका मांडली आहे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानांची भाषा करु नये असं नारायण राणेंनी रामदास कदम यांना सुनावलं आहे. काही वेळापूर्वी नारायण राणे यांनी एक पोस्ट करत रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
रामदास कदम यांनी काय म्हटलं होतं?
“महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद चाललं आहे. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. मोदी-शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात. याचं भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे”, असं रामदास कदम म्हणाले होते. आता नारायण राणेंनी यावर उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे नारायण राणेंनी?
“आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल.”
देवेंद्र फडणवीस यांचंही रामदास कदमांना उत्तर
“रामदास कदम यांना मी बरीच वर्षे ओळखतो. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याची त्यांची सवय आहे. रागानेही ते बोलतात. भाजपाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे.”
हे पण वाचा- “केसाने गळा कापू नका”, म्हणणाऱ्या रामदास कदमांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “एकनाथ शिंदेंना..”
“आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सगळ्यांचा योग्य सन्मान ठेवू. आता ठीक आहे अनेक लोक लक्ष वेधून घेण्यासाठी बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी त्या गांभीर्याने घेऊ नये. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांना उत्तर दिलं आहे.”