Ramdas Athawale On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन समितीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने दोषारोपपत्र सादर केलं आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर राज्याचं राजकारण आरोप-प्रत्यारोपाने चांगलंच तापलं.

यातच आज करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला. धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा सादर करणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला. यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याबाबत मोठं विधान केलं आहे. “धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी देखील घेतला पाहिजे”, असं मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

रामदास आठवले काय म्हणाले?

करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत धनंजय मुंडे हे राजीनामा देणार असल्याचा दावा केला. करुणा मुंडे यांच्या या दाव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल मला माहिती नाही. एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली आणि त्याबाबतची भूमिका स्पष्टपणे समोर आली”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.

“मला असं वाटतं की, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जवळचा संबंध होता. पण या घटनेत धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मला असं वाटतं अजित पवार यांनी याबाबत विचार करणं गरजेचं आहे. नीतिमत्तेच्यापेक्षा मंत्रिपद फार मोठं नाही. खूनाच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही. पण त्या घटनेतील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा होता. त्यामुळे नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि तसा निर्णय अजित पवारांनी घेतला पाहिजे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Story img Loader