कांद्याच्या किंमतीवरुन शेतकरी नाराज आहेत. त्याविषयी विचारलं असता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावर असं म्हटलं आहे की केंद्र सरकार सरकारच्या बाजूने आहे. कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी केंद्र सरकार विचार करतं आहे. धनंजय मुंडे दिल्लीत गेले आहेत. पियुष गोयल यांच्याशी चर्चा करुन त्यांनी मार्ग काढला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतं आहे असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मविआला उद्देशून कांद्यावर एक कविताही सादर केली.
काय कविता म्हटली आहे आठवलेंनी?
“महाराष्ट्रामधे मोठ्या प्रमाणावर पिकत आहे कांदा, महाराष्ट्रामधे मोठ्या प्रमाणावर पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा” अशा ओळी आज रामदास आठवलेंनी पत्रकारांपुढे सादर केल्या. तसंच ते म्हणाले कांदा हा सर्वांसाठी आवश्यक वस्तू आहे. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, तसंच जनतेलाही कांदा परवडला पाहिजे ही आमची भूमिका आहे.
शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा
रिपब्लिकन पक्ष भाजपासह आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, तसंच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. नितीन गडकरी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा करेन. आम्हाला किमान दोन जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे. मी त्यासाठी जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. शिर्डी मतदार संघात मी २००९ मध्ये हरलो होतो. त्या ठिकाणी मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर मला चालणार आहे. शिर्डीतून मला लढण्याची इच्छा आहे असंही आठवलेंनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडी नकारात्मक
प्रकाश आंबेडकर हे इंडिया नावाच्या आघाडीत जायला उत्सुक आहेत, मात्र ही आघाडी नकारात्मक आहे. मुळात या आघाडीला काहीही अर्थ नाही. नरेंद्र मोदींच्या समोर या आघाडीचा टिकाव लागणं अशक्य आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला. इंडिया आघाडी झाली आहे त्यात आप आणि काँग्रेस यांच्यातच पटत नाही हे समोर आलं आहे. या आघाडीत केजरीवालच जातील की नाही ही शंका आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
भाजपाने कुठलाही पक्ष फोडलेला नाही
संजय राऊत अगर लडना चाहते हैं तो हम आगे बढना चाहते हैं असं म्हणत रामदास आठवलेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. भाजपाने कुठलाही पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, अजित पवार शरद पवारांना सोडून आमच्याकडे आले. भाजपाने पक्ष फोडलेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते फुटून आमच्याकडे आले आहेत असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. देशात ३५० पेक्षा जास्त जागा आमच्या येतील तर महाराष्ट्रात २२५ जागा आम्हाला निवडणुकीत मिळतील असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.