रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या शीघ्रकवितेसाठी चांगलेच प्रसिद्ध आहे. मंच कोणताही असो, पत्रकार परिषद असो किंवा संसदेत असो.. रामदास आठवले आपल्या कवितांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवत असतात. यमक जुळवत तात्काळ एखादी ओळ बोलून दाखवणे, हे त्यांचे वेगळेपण. लोकसभेतही त्यांनी अनेकदा आपल्या कवितांनी सभागृहात हशा पिकवल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सोलापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रामदास आठवले यांनी शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय निर्णयावर कवितेतून खुमासदार भाष्य केलं आहे. तसेच पवार आणि आंबेडकर यांना नेहमीप्रमाणे एनडीएमध्ये येण्याचे आवतन दिलं आहे.
तुतारी या चिन्हावर काय म्हणाले?
सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आठवले यांना तुतारी चिन्हाबाबत काय वाटतं? असा प्रश्न विचारला होता. त्यावर आठवले म्हणाले, ‘शरद पवारांना मिळाली आहे तुतारी, पाहुयात गावागावात किती ऐकणारी आहेत म्हातारी…’. शरद पवारांना मिळालेलं चिन्ह चांगलं आहे. पण त्यांच्या वागण्यामुळंच आधीचे घड्याळ चिन्ह गेलं. तसंच उद्धव ठाकरेंचा धनुष्य-बाणही गेला. या दोघांचे चिन्ह भाजपामुळं गेलं, हा आरोप चुकीचा आहे. या दोघांनाही आपले आमदार सांभाळता आले नाहीत. शरद पवारांनी एनडीएबरोबर यायला हवे होते. याआधी त्यांनी जनसंघाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा यायला काही हरकत नव्हती.
‘गावा-गावतली म्हणते आहे पारु’ शीघ्र कविता करत आठवलेंची ठाकरे सरकारकडे ‘ही’ मागणी
प्रकाश आंबेडकर कुणाच्या गळ्यात…
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीत तर सामील झाले, पण जागावाटपावरून त्यांच्यात रोज खडाजंगी होत आहे. तीनही पक्षाकडून जागावाटपाबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप आंबेडकर करत आहेत. यावरून रामदास आठवले यांची भूमिका विचारली असता त्यांनी कवितेतून प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. रामदास आठवले म्हणाले, “वंचित आघाडीचे सुरु आहे तळ्यात-मळ्यात, बघुयात ते जातात कोणाच्या गळ्यात”, अशी कविता करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार नेहमी माझ्या कपडयांचे कौतुक करतात – रामदास आठवले
रामदास आठवले पुढे म्हणाले, “वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर जाणकार नेते आहेत. त्यांनी इंडिया आघाडीत जाण्याबाबत विचार करावा. तिथे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा त्यांनी एनडीएत यावे. त्यांना इकडे यायचे नसेल तर स्वबळावर निवडणूक लढवावी. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेला १२-१२-१२-१२ चा फॉर्म्युला योग्य होता. पण हा फॉर्म्युला स्वीकारला गेला नाही तर आंबेडकर यांनी स्वबळावर लढावे. जर आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेतले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या ४५ जागा निवडून येणार आहेत.”