कराड : नीरा-देवघर हा दुष्काळी भागाला वरदान ठरणारा प्रकल्प या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक रखडविला, इतकेच नव्हे,तर माहिती (डेटा) बदलून हक्काचे पाणी बारामतीला वळवत दुष्काळी जनतेवर अन्याय केल्याचा आरोप केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला.
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर व स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत नीरा-देवघर प्रकल्पाची हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. याबाबतची माहिती खासदार निंबाळकरांनी पत्रकाद्वारे दिली. त्यात म्हटले आहे,की केंद्रातील भाजप सरकारकडून या दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नीरा-देवघर आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वाट्टेल तेवढा निधी देण्यात येईल, असा ठाम विश्वासही मंत्री शेखावत यांनी दिला.
लोकसभेच्या माढा मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून नीरा-देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. माझ्या मंत्रालयाने या दोन्ही प्रकल्पांचे फेरसर्वेक्षण केले असून, या दोन्ही प्रकल्पाचे आपल्याला महत्त्व समजले असल्याने हा पाहणी दौरा केल्याचे शेखावत यांनी सांगितले. ‘नीरा-देवघर’ला ३ हजार ९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिल्याने केंद्र सरकारही या प्रकल्पासाठी निधी देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न निकाली काढेल, अशी ठाम ग्वाही मंत्री शेखावत यांनी दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.
खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले,की ‘नीरा-देवघर’चे हक्काचे पाणी पूर्वीच्या सरकारने अत्यंत सुनियोजितरित्या बारामतीला वळविले. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे फेरसर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघड झाले. जाणूनबुजून नीरा-देवघर प्रकल्प रखडवून दुष्काळी जनतेवर अन्याय केला गेला होता. आता नीरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देत हे प्रकल्प मार्गी लावू अशी ग्वाही रणजितसिंहांनी दिली.