लोकसत्ता प्रतिनिधी
अहिल्यानगर : काश्मीरमधील संघर्षात अनाथ झालेल्या मुलींसाठी महाराष्ट्रातील १७ महिलांनी तेथे जाऊन मुलींना शिक्षण व स्वावलंबनाचे धडे दिले. दहा दिवसांच्या कालावधीसाठी झालेल्या या उपक्रमात विविध कौशल्ये शिकवून मुलींना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातील मैत्रिणींनी केला. यामध्ये अहिल्यानगर शहरातील सात जणींचा सहभाग होता.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. आधिक कदम या युवकाने ही संस्था स्थापन केली. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निराधार झालेल्या मुलींच्या पूनर्वसनासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. या संस्थेची काश्मीरमध्ये ४ (श्रीनगर, बिरवा, कुपवारा, अनंतनाग) व १ जम्मूमध्ये वसतिगृह आहे. तेथे या निराधार मुली वास्तव्यास आहेत. तेथील मुलींना शिक्षण, संस्कार, आरोग्यसेवा आणि आर्थिक स्वावलंबनासाठी प्रशिक्षण दिले जाते.
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, डोंबिवली, वाशी, सातारा येथील १७ महिलांनी एकत्र येऊन काश्मीर आणि जम्मूमधील १०३ मुलींना स्वावलंबन आणि रोजगारक्षम कौशल्ये शिकवण्याचा निर्णय घेतला. दि. १० ते २० जानेवारी दरम्यान हा उपक्रम राबवण्यात आला. या महिला व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या तसेच विविध कलांमध्ये निपुण आहेत.
कोणत्याही घरात मुलांवर संस्कार करण्यासाठी आई-वडील, आजी- आजोबा असतात. पण एखाद्या संस्थेत अशी माणसे उपलब्ध होऊ शकत नाही. या मैत्रिणींनी ठरवले आपण कुटुंब, मुले, नातेवाईकांची जबाबदारी घेतच असतो, त्यातून वेळ काढून आपण या मुलींचे किमान सात दिवसासाठी पालकत्व घेऊ या. त्यांनी ठरविले आपण अशा गोष्टी मुलींना शिकवू या, ज्यामुळे त्या वस्तू तयार करायला शिकल्यानंतर भविष्यात त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
या स्वयंसेविकांनी मुलींना स्वसंरक्षण, योगासने, पेपर क्विलिंग, मोत्याचे दागिने लिप्पन आर्टचे प्रशिक्षण दिले. शिवाय महाराष्ट्रीयन पदार्थांची ओळख, ध्यानधारणा, बौद्धिक सत्रे, चारचाकी चालवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण, वॅक्स पावडर, साबण, परफ्यूम आणि फेशियल बॉम्ब तयार करणे, पुष्पौषधी आयुर्वेदातील १२ क्षारांचा वापर याचीही ओळख करून दिली. मुली या उपक्रमात आनंदाने सहभागी झाल्या. त्यांना नवीन कौशल्ये शिकताना आत्मविश्वास मिळाला.
अहिल्यानगरमधील जयश्री सोमाणी, अनुराधा बिहाणी व दीपिका भारदे यांनी मोत्याच्या वस्तू, सूर्यनमस्कार, लिप्पन आर्ट, नीता म्हस्के व गीता देशमुख यांनी इन्स्टंट रांगोळी, पेपर क्विलिंग व महाराष्ट्रीयन पदार्थ शिकविले. पद्मजा धोपावकर यांनी स्वसंरक्षण, इन्स्टंट रांगोळी, मोत्याचे दागिने शिकविले. डॉ. अंशू मुळे यांनी ध्यानधारणा, बौद्धिक सत्र व पेपर क्विलिंग शिकविले. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन संस्थेने उत्कृष्ट व्यवस्थापन केले. जम्मूमधील कडाक्याच्या थंडीतही महिलांना कोणतीही अडचण आली नाही. या उपक्रमानंतर दरवर्षी ७ दिवस समाजसेवेसाठी देण्याचा निर्णय या महिलांनी घेतला.