राजकीय दबावांना बळी न पडता पारदर्शकपणे काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा आणखी एक प्रकार गडचिरोली जिल्ह्य़ात उघड झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिला अधिकाऱ्याने हल्लेखोराच्या तावडीतून सुटका करून घेत दोन तास झुडपात आश्रय घेतल्याने तीचे प्राण वाचले. मात्र, या घटनेने हादरलेल्या ही महिला अधिकारी रजेवर गेली आहे.
केंद्र शासनाच्या अनुदानातून सध्या देशभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात गडचिरोली जिल्हय़ात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून अर्चना वानखेडे या कार्यरत आहेत. या अभियानाचा जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांशी कोणताही संबंध नाही. असे असताना वानखेडे यांना ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत बोलावण्यात आले. या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या नियुक्त्या आम्हाला विचारून का केल्या नाहीत, असा जाब त्यांना पदाधिकाऱ्यांनी विचारला. मुख्य कार्यपालन अधिकारी रूपेश जयवंशी यांच्या सूचनेचे पालन मी केले असे उत्तर वानखेडे यांनी दिले. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी वानखेडे यांना अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली.
या घटनेने वानखेडे या खचून गेल्या असतानाच ११ मार्चच्या सायंकाळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. वानखेडे या त्यांच्या कार्यालयासमोर मोबाइलवर बोलत असताना मागून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांचे दोन्ही हात मागे ओढत त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी स्वत:ची सुटका करून घेत अर्चना वानखेडे या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या झुडपांत दडून बसल्या. तेथून त्यांनी जयवंशी तसेच पोलीस अधिक्षकांना दूरध्वनी केले. त्यांनी तेथे येऊन वानखेडे यांची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा