निखिल मेस्त्री
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यमध्ये परजिल्ह्यतील व्यक्तींना जिल्हाबंदी असताना प्रस्तावित पालघर जिल्हा मुख्यालयातील अंतर्गत सजावटीसाठी ठाणे जिल्ह्यतून कामगार विनापरवाना आणले जात आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जात नसल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ठेकेदारामार्फत शासकीय नियमांची पायमल्ली होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पालघर जिल्हा मुख्यालयाचे काम सिडकोमार्फत सुरू आहे. हे काम १ मेपर्यंत पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून टाळेबंदी जाहीर केल्याने हे काम थांबविण्यात आले. पावसाळा जवळ येत असल्याने काम सुरू करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत शासनाच्या नियमानुसार व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा मुख्यालयाचे काम सुरू करण्यासाठी आलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यालयाचे काम सुरू करण्यासाठी तेथील काही ठेकेदारांना १७ एप्रिल रोजी करोनाप्रतिबंध नियम व अटीनुसार परवानगी दिलेली आहे.
मुख्यालयातील अंतर्गत सजावटीचे काम डेकॉर कंपनीला देण्यात आले आहे. त्याचा ठेकेदार गेल्या दोन दिवसांपासून कामगार वाहतूक परवाना न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून परजिल्ह्यतील कामगार मुख्यालयाच्या ठिकाणी आणत आहे. या कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता त्यांना थेट येथे आणले जात आहे. या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचे ठेकेदारामार्फत सांगण्यात आले असले तरी स्थानिक शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत कामगारांची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही असे येथे सांगितले जाते.
दोन दिवसांत सुमारे २९ कामगार नवी मुंबई येथून एका प्रकल्पातून पालघर येथे वाहतूक करून आणले जात आहेत. ही बाब संबंधित तहसीलदार व पालघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
रेड झोनमध्ये असलेल्या ठाणे जिल्ह्यतून अशा प्रकारे कामगारांची वाहतूक करणे व त्यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना जिल्हा मुख्यालय ठिकाणी असलेल्या कामगार वसाहतीत ठेवणे कितपत सुरक्षित आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे येथील नागरिकांची सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आमच्याकडे असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या मूळ परवानगीनुसार कामगारांना येथे आणले जात आहे. कामगारांच्या वैद्यकीय सुरक्षेबाबत आमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे आहेत.
– प्रशांत सोनवणे, डेकोर होम इंडिया प्रा. लि.
परजिल्ह्यतून हे कामगार आल्याची माहिती किंवा त्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार येथील कार्यालयाकडे केलेला नाही.
– डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी