जास्त उपभोग, जास्त विकास ही पाश्चिमात्य संकल्पना कुचकामी ठरली आहे. नसíगक साधन संपत्तीचा वापर विशिष्ट मर्यादेत केला पाहिजे, मर्यादेचे उल्लंघन केल्यास कोणत्याही देशाचा अपेक्षित विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. बजरंगलाल गुप्ता यांनी केले.
सहकार भारती आणि अलिबाग प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहकार केंद्रित विकास आराखडा’ या विषयावर जे.एस.एम. कॉलेज येथील जयवंत केळुसकर सभागृहात सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना डॉ. गुप्ता बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था व साम्यवादी विचार सरणीचा आढावा घेतला. अमेरिका, युरोप खंडात सरंजामशाहीमुळे जनतेची पिळवणूक व छळवणूक झाल्याचे सांगून वर्गकलह आणि वर्ग संघर्षांला जन्म दिला गेला. रशियासारखी जगातली दुसऱ्या क्रमांकाची शक्ती जर्जर का झाली, असा प्रतिप्रश्न विचारता, प्रगत राष्ट्र म्हणून मिरविणाऱ्या अमेरिकेत सबप्राइम प्रमाणित मानणाऱ्या ४० बलाढय़ बँकांना अवसायनात जावे लागणे हे कुठले बँकिंग व्यवसायातले द्रष्टेपण आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जास्त उपभोग जास्त विकास या चुकीच्या संकल्पनेचा पुरस्कार केल्यामुळे जागतिक मंदीचा उदय झाल्याचे डॉ. गुप्ता यांनी नमूद केले.
भारतात देखील जीडीपी संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची नितांत गरज आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पी. चिदम्बरम यांनी जीडीपीचा दर ५ टक्के असल्याचा निर्वाळा देत सन २०१३-१४ मध्ये तो ६.५ टक्के इतका अपेक्षिला आहे. सरकारच्या मते आजदेखील ३५ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे असे सांगितले जात असले, तरी
जाणकारांच्या मते ती ५० टक्के आहे. दुर्दैवाने या मोठय़ा घटकाला जीडीपीमध्ये काय स्थान आहे, याव्यतिरिक्त अन्य बरेच घटक अंतर्भूत केल्यास हा दर विकसनशील देशांच्या बरोबरीने नसला तरी त्यांच्या जोडीला येऊ शकतो असे भाष्य केले.
राष्ट्रीय संपत्तीमध्ये पर्यावरण, जीवजंतू, पशु-पक्षी यांचे संवर्धन झाले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीची सर्वार्थाने मूलभूत गरज पूर्ण व्हायला हवी, तसेच सर्वाना समान संधी, रोजगार मिळाल्यास सर्वे भवन्तु सुखिन:। सर्वे सन्तु निरामय:। ही उदात्त भारतीय विचारधारा अखिल मानव जातीचे कल्याण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या व्याख्यानानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गुप्ता यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पवार यांनी केले. तर सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव प्रा. उदय जोशी यांनी सहकार भारतीचा उद्देश कथन केला. या प्रसंगी व्यासपीठावर अर्थतज्ज्ञ डॉ. गुप्ता, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, महामंत्री जितुभाई व्यास, प्रा. उदय जोशी, प्रफुल्ल पवार, भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader