‘अप्रकाशित पु.ल.’च्या प्रकाशन समारंभात मानसपुत्र दिनेश ठाकूर यांचे गौरवोद्गार
पुलंनी स्वत:च आपले न आवडलेले साहित्य ‘छापू नये’ असा शेरा मारून बाजूला ठेवले होते. मात्र, त्यांच्या उर्वरित उत्तम साहित्याचे संकलन म्हणजे ‘अप्रकाशित पु. ल.’, अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांचे मानसपुत्र डॉ. दिनेश ठाकूर यांनी ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवारी प्रकाशित विशेषांकाचा गौरव केला. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांनी प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावरून पुलंबद्दलच्या आणि विशेषांकाविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
आजवर कधीही वाचनात किंवा ऐकण्यात न आलेला ऐवज घेण्यासाठी वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि वेगवेगळ्या प्रसंगातील पुलंच्या भावना शब्दबद्ध केलेला मौलिक ऐवज ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित ‘अप्रकाशित पु. ल.’ विशेषांकाद्वारे हाती पडताच वाचकांनी समृद्ध झाल्याची प्रचिती शुक्रवारी घेतली. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांची सलग काव्यधारा रसिकांनी अनुभवली.
‘लोकसत्ता’तर्फे पुलंच्या अप्रकाशित साहित्याचा समावेश असलेल्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘आयुका’चे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी निरंजन अभ्यंकर, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, सहायक संपादक मुकुंद संगोराम, प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सुशील जाधव, मँगो हॉलिडेजचे मिलिंद बाबर आणि पितांबरीच्या आदिती कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. या लेखनाच्या स्वामित्व हक्काचा एक लाख रुपयांचा धनादेश अभ्यंकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पुलं म्हणजे भाईकाका आणि सुनीताबाई यांनी पुस्तकांचा आणि कार्यक्रमांचा दर्जा उत्तम राहावा याची दक्षता घेतली. त्यामुळेच कार्यक्रम लोकप्रिय असताना त्यांनी ते सादर करणे बंद केले, असे सांगत दिनेश ठाकूर यांनी ‘अप्रकाशित पु. ल.’च्या निर्मितीमागची कथा उलगडली. हा विशेषांक प्रकाशित केल्याबद्दल ‘लोकसत्ता’विषयी कृतज्ञता व्यक्त करून ते म्हणाले,‘आचार्य अत्रे सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगीचे पुलंचे भाषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेले मानपत्र, ‘उंबरठा’ चित्रपटासंदर्भात पुलंनी व्यक्त केलेले मत, साने गुरुजी, विंदा, गदिमा आणि लता मंगेशकर यांच्याविषयीचे लेखन असा आजवर प्रसिद्ध न झालेला ऐवज या अंकामध्ये आहे. उत्तम दर्जाचे, अप्रकाशित आणि सुनीताबाई यांची परवानगी असलेले हे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाला ‘लोकसत्ता’ची साथ लाभली.’
पुलंच्या साठीला जयवंत दळवी यांनी ‘साठवण’ हा ग्रंथ सिद्ध केला होता. त्या वेळी ‘आपल्यासारख्या प्रतिभावान लेखकाचा वेळ यामध्ये जाऊ नये’, अशी भावना पुलंनी व्यक्त केली होती. मात्र, श्री. पु. भागवत यांनी केलेल्या ‘दाद-चार शब्द’ या संकलनाची पुलंनी प्रशंसा केली होती, या आठवणीला उजाळा देत ठाकूर म्हणाले,की कागद, पेन आणि केराची टोपली ही लेखकाची सामग्री असते. लेखनाची भट्टी जमली नाही म्हणून पुलंनी अनेक लेख, नाटकांचे लिहिलेले कागद फाडून टोपलीत टाकले आहेत.
दिनेश ठाकूर यांनी कष्ट घेतले नसते तर हा विशेषांक होऊच शकला नसता, याकडे लक्ष वेधून कुबेर म्हणाले,‘ ‘उंबरठा’ चित्रपटावर पुलंनी भाषण केले होते. त्याची ध्वनिफीत मिळवून त्याचे शब्दांकन त्यांनी केले. हा मौलिक ऐवज त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिला हा महत्त्वाचा भाग आहे. पुलंचे हस्ताक्षर असलेली संहिता हातामध्ये घेताना रोमांच अनुभवला.’