भंडारा जिल्ह्य़ातील ‘खरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देऊन वास्तवात न घडलेल्या घटना वगळण्यात याव्या, अशी मागणी सचिन कस्तुरे यांनी केली आहे.
या चित्रपटात पीडित भय्यालाल भोंतमांगे यांना व्यसनाधीन, सरपंच व पोलीस पाटील यांच्यासमोर हात जोडून शरणागती पत्करल्याचे दृष्य, तसेच मुलींचे प्रेमप्रकरण आदि अवास्तव दृष्ये चित्रित केली गेली आहेत. प्रत्यक्षात भोतमांगे हे एक स्वाभिमानी आणि अन्यायाला न जुमानणारे व्यक्ती आहेत. चित्रपट निर्मितीअगोदर भोतमांगे यांना कोणत्याच प्रकारची प्राथमिक विचारणा करण्यात आली नाही. खरलांजीतील घटना ही कथा, कादंबरीवर आधारलेली नसून एक सत्य घटना आहे. हे हत्याकांड कसे घडले, हे सर्व जनतेला माहिती आहे. निर्मात्याने त्याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून घटनेमागील सत्यता पडताळून पाहणे अपेक्षित होते. चित्रपटातून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा असतो. मात्र, या चित्रपटातील अवास्तव घटनेमुळे समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो. तेव्हा अशी संवेदनशील निर्मिती करीत असतांना सामाजिक आत्मभान ठेवणे गरजेचे आहे. तरी याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन चित्रपटातील अवास्तव घटना वगळण्यात याव्यात. अन्यथा, लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन कस्तुरे यांनी दिला आहे.

Story img Loader