वाडा : वाडा तालुक्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपार नंतर ढगाळ वातावरण बनले होते. त्यानंतर अचानक साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला, काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस पडू लागल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई यांसह कोकणात विजांचा गडगटासह, वारा, हलक्या व मध्यम पाऊसाचा इशारा दिला आहे, पुढील चार दिवस पावसाला वातावरण पोषक असल्याचे सांगितले आहे.

आज (४ एप्रिल) वाडा शहरात तालुक्यातील कुडूस, डाकिवली, लोहपे, सोनाळे, कळंभे, बोरांडा, मोज, अबिटघर या परिसरांसह अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह तासभर पाऊस पडला. वाडा शहरात देखील जोराचा धूळ वारा आणि हलक्याशा / तुरळक सरी पडल्या.जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे, सौर दिव्यांचे पोल उन्मळून पडले आहे. मोज येथील सुनील कोर यांच्या घरावरील तसेच वाडा शहरातील एका इमारतीवरील पत्रे वाऱ्याने जोरदार उडविले, यात त्यांचे मोठे नुकसान झाले.

अचानक आलेल्या पावसामुळे काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी खंडित झालेला वीजपुरवठा पूर्वरत झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्णता वाढली होती, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे थंडावा निर्माण झाल्याने नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

एप्रिल महिन्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी भातझोडणी करिता खळ्यावर ठेवलेले भाताचे भारे, शेतीत रब्बी हंगामात घेत असलेले भुईमूग, तीळ, हरभरा, वाल, उडीद यांच्यासह मिरची, वांगी, टोमॅटो, कारली, काकडी, चवळी, भेंडी, गवार यासारखी भाजीपाला लागवड केलेली पीक त्याचबरोबर आंबा, काजु, चिकू या फळ बागायतदारांचे देखील मोठे नुकसान होवुन आर्थिक नुकसान झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत निश्चित आकडा मिळालेला नाही. मात्र, यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जातो की काय.? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याने ते चिंतेत आहेत.मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाळी ढगाळ वातावरण अंशता ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज कोसबाड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्राने व्यक्त केला होता. पावसाळी सदृश्य ढगाळ वातावरण आणि कमाल तापमानात वाढ होऊन ते 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत राहीले.