गेल्या रविवारी, सोमवारी झालेल्या गारपिटीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. गारांचा तडाखा इतका जबरदस्त की, गव्हाच्या शेतात एकही ओंबी उरली नाही. पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा हे अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांमध्येही आता त्राण उरलेले नाही.. धामणगाव रेल्वेचे सधन शेतकरी मोहन सिंघवी सांगत होते.
मोहन सिंघवी यांच्या शेतातील पाच एकरांमधील गहू गारपिटीने पूर्णपणे उद्ध्वस्त केला. अवघ्या काही मिनिटांमध्ये शेताचे दृश्यच पालटून गेले. परिसरातील शेतांमध्ये, रस्त्यांवर गारांचा खच होता. हा गारांचा वर्षांव की हिमवर्षांव, अशी स्थिती होती. गावकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली तेव्हा त्यांना गारपिटीच्या तीव्रतेची जाणीव झाली. जुना धामणगाव परिसराला बसलेला हा गारपिटीचा तडाखा अभूतपूर्व होता. गारांचा खच पाहण्यासाठीच मोठी गर्दी झाली होती. पाच एकरांमधील काढणीवर आलेला गहू पूर्णपणे मोडला आहे. आपण यातून सावरू, पण इतर अल्पभूधारकांचे काय, असा सवाल मोहन सिंघवी करतात. त्यांच्या शेतातील मक्याच्या पिकाचीही पूर्णत: वाताहत झाली आहे. जुना धामणगाव परिसरातीलच गजानन ढाकुलकर यांच्या शेतातील चार एकरांतील गहूही संपूर्ण नष्ट झाला आहे. त्यांच्या शेतातील नुकसान पाहण्यासाठीही शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. गेल्या पंधरा दिवसांमध्ये या भागात चौथ्यांदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.
दशकभरापूर्वी कोरडवाहू असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यात सिंचन सुविधेमुळे शेतकरी रब्बीतही पिके घेऊ लागले आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि रब्बीत हरभरा, गहू ही प्रमुख पिके. यंदा खरिपात पावसाच्या अनियमिततेने उत्पादनात घट झालेली. रब्बीत भरपाई होईल, या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना रब्बीतही बसलाच. अवकाळी पावसानंतर सरकारी यंत्रणा पंचनामे करण्यातच व्यस्त आहे. शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळालेली नाही. पुढच्या वर्षी शेती कशी करावी, हा त्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांची मुले-मुली विवाहयोग्य झाली आहेत. यंदा त्यांच्या विवाहाची तयारी सोडाच, स्थळ पाहणीही पुढे ढकलण्याची वेळ आली आहे, असे मोहन सिंघवी यांनी सांगितले. रोज मरे त्याला कोण रडे, अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. मुळात शेतकरी आशावादी आहे. निसर्गाच्या संकटांचा यापूर्वीही त्याने मुकाबला केलेला आहे, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. सततच्या आघातांनी तो खचून गेला आहे. गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीतून काहीच हाती येणार नाही आणि आता उन्हाळ्यात शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीला जुंपावे लागणार आहे. त्यासाठी पुन्हा पैशाची जुळवाजुळव.. हे दुष्टचक्र थांबावे, हीच शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
मोहन अटाळकर, अमरावती
फक्त काही मिनिटे .. अन् गव्हाचा ‘खेळ’च आटोपला!
गेल्या रविवारी, सोमवारी झालेल्या गारपिटीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. गारांचा तडाखा इतका जबरदस्त की, गव्हाच्या शेतात एकही ओंबी उरली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-03-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain and hailstorms destroy wheat crops