सोलापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सोलापूर व जिल्हा ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस कोसळला. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला आदी भागात कमीजास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र अक्कलकोटमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे तेथील शेतांमध्ये पाणी साचले. ओढे व नाल्यांनाही पाणी आले होते. मैंदर्गी येथे वीज कोसळून दोन जनावरे दगावली.
सोलापुरात मागील तीन-चार दिवसांपासून अत्यल्प पाऊस होत असताना शनिवारी मात्र त्यात जोर होता. शहरात दुपारी ८ मिली मीटर पावसाची नोंद झाली. अक्कलकोट शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. वादळी वारेही वाहू लागले. त्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला. रुद्देवाडी, कडबगाव, मैंदर्गी, किणी, बोरी उमरगे, खैराट, संगोगी, तोरणी, जकापूर, उडगी, नागूर व इतर गावांमध्ये पावसाचा जोर होता. काही गावांमध्ये वादळी वा-यांमुळे घरांवरील छप्पर उडून गेले. जुन्या घरांची पडझड झाली.
हेही वाचा…सोलापूर: भाजप उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनात चोरट्यांची ‘हाथ की सफाई’
दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढताना एका गावात वीज कोसळली. या दुर्घटनेत एका आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. लावण्या माशाळे असे मृत मुलीचे नाव आहे. मुस्ती गावच्या शिवारात ही दुर्घटना घडली.
हेही वाचा…निवडणुकीनंतर शिंदे, पवारांचे पक्ष संपल्यावर भाजपची ढेकर – संजय राऊत
मंगळवेढा तालुक्यात कचरेवाडी, खुपसंगी, ब्रह्मपुरी, माचणूर, बठाण, आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. बठाण शिवारात वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आंबा पिकाचेही नुकसान झाले. सांगोला परिसरात वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही गावांमध्ये घरांवरील छप्पर उडाले. यात एका चिमुकल्या मुलीसह दोघे जखमी झाले.