सध्या सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे द्राक्षाचे भाव ढासळले आहेत. याबरोबरच निर्यातक्षम द्राक्षालाही फटका बसला आहे.
दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी तीव्र उन्हामुळे द्राक्षाचे मणी फुटू लागले आहेत. गेल्यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातले द्राक्ष तोडून टाकण्याची वेळ आली होती. अशीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे स्थानिक द्राक्ष शेतकरी आबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
कोरोना काळात द्राक्षांना भाव मिळाला नव्हता. तरीदेखील यंदा पुन्हा एकदा शेतकरी जोमाने कामाला लागले. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं ८० ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
हे ही वाचा >> गँगस्टर बिश्नोईसाठी दोन अल्पवयीन बहिणी घरातून पळाल्या, झारखंडहून थेट गाठलं पंजाब, तुरुंगाबाहेर पोहोचताच…
बोगस औषधांवर सरकाराने ठोस निर्णय घ्यावा
देशमुख म्हणाले की, बोगस औषधांमुळे फळांचं मोठं नुकसान होत आहे. सरकाराने त्यावर ठोस निर्णय घ्यावा. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये द्राक्षबागांचं नुकसान झालं, त्याची भरपाई मिळालेली नाही. सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी आमचादेखील विचार व्हावा. अन्यथा शेतकऱ्यांसमोर जमीन विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.