राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. ठिकठिकाणी वीज कोसळल्याने आठजण ठार झाले आहेत. वीज कोसळून कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले येथे शुक्रवारी तीन जण ठार झाले. भानुदास बंडा कांबळे (रा.घाणेवाडी, ता.कवठेमहांकाळ) व विलास भीमराव माने (रा.शिरूर, ता.अथणी, जि.बेळगाव) असे मृत्यू पावलेल्यांची नावे असून एकाचे नाव समजले नाही. सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस तालुक्यात एकजण तर औरंगाबाद जिल्ह्य़ात चारजण वीज कोसळल्याने ठार झाले. हिंगोली जिल्ह्य़ात शुक्रवारी दुपारी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औंढा तालुक्यातील आजरसोंडा येथील शेतकरी विजय आहेर यांची बैलजोडी वीज पडल्याने मृत्युमुखी पडली. पुणे परिसरात शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सर्वच भागात अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. काही भागात पाच मिनिटे, तर काही भागात १५ मिनिटांपर्यंत पाऊस पडला. पुणे शहर, उपनगरांसह पिंपरी-चिंचवड व आसपासच्या परिसरातही पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यात येत्या दोन दिवसांत पावसाच्या काही हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader