बिगरमोसमी पावसाने सिंधुदुर्गला झोडपले आहे. गेल्या ४८ तासांत जिल्ह्य़ात ९६ मि.मी. पाऊस कोसळला. वेंगुर्लेवगळता अन्य सातही तालुक्यांत पावसाचा शिडकावा झाला असून, वीज कोसळल्याने नेतर्डे येथील सूर्यकांत नारायण परब (३८) व आंबेगाव येथील दिगंबर परब यांच्या रेडय़ाचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात चक्रीवादळासह कोसळलेल्या पावसाने दणका दिला. झाडे रस्त्यावर, घरावर, विजेच्या व टेलिफोन खांबावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. पावसाळी स्थिती आजही सर्वत्र होती.
नेतर्डेत काजू गोळा करण्यासाठी गेलेला सूर्यकांत नारायण परब वीज कोसळून ठार झाला, तर आंबेगावमध्ये वीज कोसळून रेडा मृत्युमुखी पडला. त्याशिवाय मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. त्याचे मोजमाप सुरू ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात ९६ मि.मी. पाऊस कोसळला. त्यात सर्वाधिक कणकवली ५१ मि.मी., तर सावंतवाडी ३५ मि.मी. एवढा पाऊस कोसळला. दोडामार्ग १४ मि.मी., देवगड २ मि.मी, वैभववाडी २७ मि.मी, मालवण ९ मि.मी. व कुडाळ ९ मि.मी. एवढा पाऊस कोसळला. वेंगुर्लेत पाऊस कोसळला पण पर्जन्यमापक असणाऱ्या ठिकाणी तो कोसळला नसल्याने नोंद झाला नव्हता.
वीज खांबांचे नुकसान झाल्याने कालपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. आज दुपारनंतर हा पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain killed one in sindhudurg