अवकाळी पावसाने राज्याच्या काही भागांना सोमवारी तडाखा दिला. बदललेल्या हवामानाने पिंपरी भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या तर पुणे शहरातही पावसाचा शिडकावा झाला. दहा दिवसांनंतर पुन्हा सोमवारी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह गहू, हरभरा व कांदा पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. रविवारी आलेल्या वादळी वाऱ्याचा व गारपिटीचा तडाखा नागपूर जिल्ह्य़ातील १०, अमरावती जिल्ह्य़ातील ४, तर यवतमाळ जिल्ह्य़ातील ६ तालुक्यांना बसला असून गहू, हरभरा, तूर, संत्र्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
बदललेल्या हवामानाचा परिणाम पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी पाहायला मिळाला. लोहगाव येथे ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हिमालयाच्या प्रदेशात वाहणारे पश्चिमी वारे तसेच, गुजरात व उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यांचा परिणाम म्हणून हे बदल झाले आहेत, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. त्याचा प्रभाव मंगळवारीसुद्धा जाणवेल, त्यामुळे हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात सोमवारी साडे चारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. साधारणत: अर्धा तास अवकाळी पावसाने या भागात झोडपून काढले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे स्वरुप रिमझिम होते. येवला, ओझर, पिंपळगाव बसवंत या परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरातील अंबड, राणेनगर, नाशिकरोड अशा काही भागातही सायंकाळी पावसाने सर्वसामान्यांची तारांबळ उडवून दिली. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना हे संकट कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Story img Loader