सांगली : तीव्र उष्म्यानंतर मिरज पूर्व भागासह तासगाव, पलूस तालुक्यात वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. आरग येथे वीज पडून एक तरुणाचा मृत्यू झाला, तर वादळी वाऱ्याने झाडे, फांद्या मोडून पडल्याने तासगाव ते सांगली व कर्नाटक सीमेवर म्हैसाळ येथे वाहतुकीचा खोळंबा झाला. रात्री मिरजेसह पूर्व भागात बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

गेल्या आठवडाभर वाढत्या उन्हामुळे काहिली झाली असताना पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह जोरदार पावसाने पाऊण तास दमदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे शहरात विजेचा पुरवठा मध्यरात्रीपर्यंत खंडित झाला होता. वीजवाहक तारांवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने आणि काही ठिकाणी खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. दमदार पावसाने मिरज शहरात मंगल चित्रमंदिर व तांदूळ मार्केट परिसरात रस्त्यावर दोन फुटांनी पाणी वाहत होते.

आरग (ता. मिरज) येथे वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत उदय विठ्ठल माळी (वय ३३) हा तरुण ठार झाला. माळी हे कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना अचानक विजेचा कडकडाट आणि जोरदार वादळ आले. यात वीज अंगावर कोसळल्याने ते जागीच ठार झाले, तर मान्सूनपूर्व पावसाने आंबा, केळी आणि द्राक्ष पिकाची हानीही झाली आहे. पावसात सुरुवातीची काही मिनिटे गारपीटही झाली. या गारपिटीमुळे आंबा, केळी घडाला नुकसान होणार असून, एप्रिल छाटणी झालेल्या द्राक्षबागेत कोवळ्या काड्यांवर गारांचा मारा झाल्याने फळधारणा होण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.

मिरज पूर्व भागातील एरंडोली, मल्लेवाडी, आरग, बेडग, खटाव, लिंगणूर परिसरात दमदार पाऊस झाला, तर तासगाव तालुक्यात कवठेएकंद, कुमठे परिसरात चांगला पाऊस झाला. झाडे पडल्याने तासगाव-सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ खंडित झाली होती, तर म्हैसाळ ते कागवाड मार्गावरही झाडांच्या फांद्या वादळाने मोडून पडल्याने कर्नाटक मार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपर्यंत खंडित झाली होती. आज सकाळपासून सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्ववत झाली.