राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला व फळांच्या भावात येत्या महिनाभरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात व्यक्त होत आहे.
यंदा गहू, हरभरा, ज्वारी यांचे विक्रमी उत्पादन अपेक्षित होते. राज्यात रब्बी पिकाचे ६३ लाख हेक्टर क्षेत्र असून, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी १०० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शेतमालाचे दर बाजार समित्यांच्या आवारात आधारभूत किमतींपेक्षाही कमी होते. पण, गारपिटीत गहू, हरभरा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यानंतर दरवाढ सुरू झाली.  
सध्या भाजीपाला मातीमोल दराने विकला जात होता. कोबी, फ्लॉवरचे ठोक दर १ ते २ रुपये किलो होते. टोमॅटो, वांगी, बटाटे, कांदे, मेथी, पालक, गाजर, दोडके यांचे दर खूपच कमी झाले होते. आता गारपिटीने खराब झालेला भाजीपाला तीन आठवडे बाजारात येईल. तोपर्यंत भाव कमी राहतील, पण, त्यानंतर भाजीपाल्याच्या भावात मोठी तेजी अपेक्षित आहे. गवार, वाटाणा, मिरची, दोडके, कारले, पालक, बटाटे, वांगी, भोपळे, कोबी, फ्लॉवर या भाजीपाल्यांचे दर महिनाभरानंतर किलोला ३० ते ८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यंदा कांदा लागवड तिप्पट क्षेत्रात झाली होती. त्यामुळे दर कमी झाले होते. कांदा ५ ते १० रुपये दराने विकला जाण्याची शक्यता होती. पण नाशिक, नगर, पुणे, सोलापूर व मराठवाडा या कांदा उत्पादक प्रदेशात गारपीट होऊन कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ३०० ते ५०० रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा १ हजार १०० रुपयांवर गेला. हा दर दुप्पट होण्याची शक्यता आहे.  साखरेचे दरही महिनाभरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढले आहेत. राज्यात फळबागांचेही मोठे नुकसान झाले. सव्वा लाख एकरातील द्राक्षबागांना त्याची झळ पोचली. त्यामुळे सध्या २० ते ३० रुपये किलो द्राक्षाचा ठोक दर आहे. तो ४० रुपयांवर पोहोचेल. किरकोळ बाजारात द्राक्ष ६० ते १०० रुपये दराने महिनाभरात विकली जातील, असा अंदाज आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतमालाचे दर कोसळले होते. महागाई कमी होण्याची चिन्हे होती. दोन वर्षांनंतर सकारात्मक चित्र होते. पण, गारपिटीने अर्थकारणच बदलविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा