राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असून लाखो हेक्टर क्षेत्रातील शेती, फळबागा आणि भाजीपाला मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील सुमारे १५ लाख हेक्टर्स क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोलापूर येथे दोन दिवसांत चारजण मृत्युमुखी पडले असून तेथे मृतांचा आकडा सातवर गेला आहे. निम्म्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा कहर सुरू असून अनेक भागांत घरांचे पत्रे उडून लोक बेघर झाले आहेत. वादळवाऱ्यांनी विजेचे खांब उन्मळून आणि तारा तुटून अनेक गावे अंधारात गेली आहेत तसेच वीज कंपन्यांचेही कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारपासून तापमानात वाढ होणार असून गारपिटीतून राज्याची सुटका होणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या अस्मानी संकटाने राजकीय क्षेत्रालाही हादरा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना किती मदत द्यायची याबाबत निकष निश्चित करण्यात आले आहेत. ही मदत फारच अपुरी असल्याने ती वाढवून द्यावी, अशी सर्वच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. विशेषत: निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पुरेशी मदत न दिल्यास त्याचा मतदानात फटका बसेल, अशी भीती सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना भेडसावत आहे. त्यामुळे गारपीटग्रस्तांना वाढीव मदत देण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत सूचित केले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सोमवारी झालेल्या बैठकीत गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन सचिव मििलद म्हैसकर यांनी नुकसानीचा तपशील आकडेवारीसह मांडला. या मदतीबाबतचे धोरण मंत्रीमंडळ बैठकीनंतर बुधवारी जाहीर होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सोमवारी बीड येथे सांगितले. गारपीटग्रस्त गावांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकही बुधवारी राज्यात येत आहे. त्या आधीच या भागांचा दौरा शरद पवार यांनी सुरू केला आहे. मुख्यमंत्री मंगळवारी दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्य़ात गारपिटीत दोन दिवसांत चारजण मृत्युमुखी पडले असून मृतांचा आकडा सातवर गेला आहे. २६ फेब्रुवारीपासून पाच ते सहावेळा गारपीट व वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आकडा वाढत असून आतापर्यंत ५९० गावे या आपत्तीत सापडली आहेत.
आठवडय़ापासून नाशिक जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेला पाऊस आणि गारपीट थांबण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नसून तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे खर्डे, वरवंडी, खामखेडा, भऊर या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. वरवंडी, खामखेडा परिसरात मेंढय़ांसह तरस, मोर यांसारख्या वन्य प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्य़ात वीज खांब उन्मळून पडले तसेच ताराही तुटल्या. यामुळे १५० गावे अंधारात गेली असून वीज कंपनीचेही सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मराठवाडय़ात शेतातून घाईने काढलेल्या भाजीपाल्याला बाजारपेठच मिळत नसल्याने भाजी रस्त्यावर फेकून दिली जात आहे. भाज्यांचे भाव घसरत असले तरी गारपिटीने नवी लागवड न होऊन काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पुढील दोन दिवस मी मराठवाडा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेणार आहे. या दौऱ्यानंतरच मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या पिकासाठी किती मदत द्यायची याचा निर्णय घेतला जाईल. सध्या आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाशी चर्चा करून मगच वाढीव मदतीचा निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण</p>
उद्या केंद्रीय पथक येणार
* बुधवारी (दि. १२) केंद्राचे पथक जिल्हय़ात गारपीटग्रस्त गावांची पाहणी करण्यास येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे दिली.
* गारपीटग्रस्त भागातील पूर्ण पंचनामे होऊन त्याचा अहवाल राज्य सरकार एकत्रित करून केंद्र सरकारकडे पाठवील. त्यानंतर केंद्रातून अधिकाऱ्यांचे पथक गारपीटग्रस्त भागास भेट देईल.
* पथकाकडून प्राप्त अहवाल केंद्राचे वरिष्ठ सचिव व विविध विभागांचे अधिकारी एकत्रितरीत्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करतील. या अहवालावरूनच केंद्राकडून मदत पाठवली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
* अतिवृष्टी आणि गारपीट यांचा पीक विम्यात समावेश करावा या संदर्भात संबंधित विमा कंपन्यांशी आपले बोलणे झाले. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बठकीतून गारपिटीसंदर्भात राज्य सरकार धोरण जाहीर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
* पाच वर्षापूर्वी एका राज्यात आचारसंहितेच्या कालावधीत अशाचप्रकारे परिस्थिती उद्भवली होती तेव्हा निवडणूक विभागाने परवानगी दिल्याचे पवार यांनी सांगितले.