अलिबाग : अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर झाला आहे. अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकुण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातुन दरवर्षी जवळपास २१  हजार ४२४  मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पिक चांगले येईल अशी अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु अवकाळी पडलेला पाऊस ,  वाढलेले तापमान यामुळे  फळ गळती झाली. रोहा व कर्जत तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

हेही वाचा >>> गोंदिया : तापमान वाढले, शाळांचे वेळापत्रक बदलले; वाचा कुठे ते…

दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्यास सुरवात होते. जानेवारी महिन्यात या पालवीला मोहर येण्याची प्रक्रीया सुरु होते. मात्र या वर्षी हि प्रक्रीया उशीरा सुरु झाली. एकुण उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतांनाच अवकाळी पाऊस पडला त्यानंतर तपमानात वाढ झाली. वाढलेल्या उष्णतेचा फळांवर विपरीत परिणाम दिसून येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट होईल की काय अशी भिती बागायतदारांना वाटते आहे. “अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.”

डी. एस. काळभोर , कृषि  उपसंचालक, रायगड अवकाळी पावसापेक्षा उष्णतेचा मोठा फटका पिकावर झाला आहे. मोहर येण्याच्या स्थितीत उष्णता वाढल्याने अपेक्षित फळधारणाच झाली नाही. त्यामुळे यावर्षी चांगल्या पिकाची आशा धुळीला मिळाली आहे.

-डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार

Story img Loader