भाजपतर्फे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावण्याच्या तयारीत केंद्रातील सरकार असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे केला.
कापूस, सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद दरम्यान आयोजित िदडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. सीबीआयने मोदींना कोणत्या प्रकरणात हैराण केले, याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. भाषणातील मोदींबाबतचा हा ओझरता उल्लेख कार्यकर्त्यांच्या चच्रेचा मुद्दा होता.
लातूर जिल्ह्यातील लोदगा ते औरंगाबाद दरम्यान भारतीय जनता किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी काढलेल्या यात्रेचा समारोप सोमवारी येथे झाला. या प्रसंगी शेतकरी िदडीत पायी चालत राजनाथ सिंह सहभागी झाले. पठण गेट येथून निघालेल्या िदडीचा आयुक्त कार्यालयासमोर समारोप झाला. भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार पंकजा पालवे, सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती. िदडी आयोजित करणारे भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
राजनाथ सिंह म्हणाले की, देश सध्या गंभीर अवस्थेतून जात आहे. पाकिस्तानने डोळे वटारले आहेत. दहशतवादाला संपविण्यास आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. अशा काळात मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केल्यानंतर त्यांना हैराण केले जात आहे. पण भाजपा पाठीशी असल्याने मोदींनी काळजी करू नये. तसे त्यांना कळविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते ज्या गोष्टींना हात लावतात ती गायब होते. कधी ते कांद्यावर हात फिरवतात, तो गायब होतो. कधी ते डिझेलवर हात फिरवतात, ते संपते. अलीकडेच त्यांनी कोळशाच्या फाईलवरून हात फिरवला व तीही गायब झाली, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभाराची खिल्ली उडविली.
भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा पक्ष आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर राष्ट्रीय स्तरावर किमान आधारभूत किंमत ठरविणाऱ्या समितीला वैधानिक अधिकार देण्याची शिफारस करू, असेही ते म्हणाले. पाणीप्रश्नावर नदीजोड हा पर्याय असल्याने ती योजना कार्यान्वित केली जाईल. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दर आकारून पहिल्या वर्षी कर्ज दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
खासदार मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच अजित पवार यांनाही तुरुंगात जावे लागेल. सरकार आल्यावर हे काम मी करेन, असे मुंडे यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन व उसाला योग्य भाव न मिळाल्यास नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी जाहीर केली. पाशा पटेल यांचा फळे व भाज्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा