संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत चालला आहे. मंत्री विखे यांच्या प्रभावक्षेत्राखाली असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे नव्याने अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आश्वी येथील या कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांची यादी कळीचा मुद्दा ठरला असून त्यावरून राजकारण तापणार आहे. संगमनेर शहराच्या हद्दीला खेटून असणारी गावे थेट आश्वीला जोडली जाणार असल्याने तेथील गावकऱ्यांनी संतापाची भावना व्यक्त केली. जर हे कार्यालय खरोखरच सुरू झाले तर भौगोलिक दृष्ट्या सध्याच्या संगमनेरचे उत्तर संगमनेर आणि दक्षिण संगमनेर असे दोन तुकडे पडणार आहेत. याशिवाय या निर्णयाचे दूरगामी परिणाम देखील गंभीर असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय आणि त्याला एक जोडण्यात येणाऱ्या गावांची यादी समाज माध्यमात व्हायरल झाल्याने तालुकाभर या एकाच घटनेने मोठी सामाजिक व राजकीय खळबळ उडवून दिली. ‘घात झाला’, ‘तालुक्याची मोडतोड सुरू’ अशा आशयाचे समाज माध्यमातील संदेश गाव खेड्यापर्यंत पोहोचले. हा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीच जाणीवपूर्वक घेतला असल्याचेही लपून राहिले नाही. त्यामुळेच या निर्णयाचा संगमनेर तालुक्यातून तीव्र विरोध केला जाईल, वेळप्रसंगी आंदोलनही उभारले जाईल असा इशारा माजी मंत्री थोरात यांनी दिला आहे.

आश्वी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू होत असेल तर आसपासच्या गावातील लोकांची सोय होईल, परंतु संगमनेर लगतच्या गावांवर राजकीय सूड उगवला जाऊ नये अशी एकंदरीत जनभावना उमटली. याबाबत प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी संपर्क केला असता, आपण काही दिवस सुट्टीवर असल्याने याबाबत आपल्याला कल्पना नसल्याची त्यांनी सांगितले. तहसीलदार धीरज मांजरे यांनीही प्रतिसाद दिला नाही. याबाबतची वास्तव स्थिती अशी आहे की, संगमनेर तालुका विस्ताराने प्रचंड मोठा आहे. आश्वी हे गाव संगमनेर तालुक्यात असले तरी विधानसभेला ते मंत्री विखे यांच्या शिर्डी मतदारसंघाला जोडलेले आहे. आश्वी आणि परिसरातील पंचक्रोशीला संगमनेर पेक्षा लोणी, शिर्डी अधिक जवळचे वाटते, हेही वास्तव आहे.

यापूर्वी आश्वी येथे स्वतंत्र पोलीस ठाणेही सुरू झालेले आहे. महसूलच्या कामांसाठी तेथील जनतेला संगमनेर दूर पडते. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी म्हणून आश्वी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय होत असेल, तर त्याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावांच्या नावावरून मोठा वादंग उभा राहण्याची चिन्हे आहेत. संगमनेर आणि संगमनेर खुर्द या दोन गावांच्या मधून केवळ प्रवरा नदी वाहते. तरीही संगमनेर खुर्द गावासह त्या पंचायत समिती गणातील सर्व गावे आश्वी तहसीलला जोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे ! या गावातील लोकांना आपल्या कामासाठी जायचं असेल तर संगमनेरला येऊन आश्वीला जावं लागेल इतके ते उफराटे आहे. त्यामुळेच या गावातून संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण आता पुढे कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आश्वी तहसील मध्ये समाविष्ट होणारी गावे : पूर्वीपासूनची आश्वी बुद्रुक महसूल मंडळातील गावांसह नव्याने संगमनेर शहरानजीक असलेल्या संगमनेर खुर्द या महसूल मंडळात संगमनेर खुर्द, खांडगाव, वैदुवाडी, चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, रायतेवाडी, देवगाव, निमगाव टेंभी, शिरापूर, निमज, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, हिवरगाव पावसा या गावांचा समावेश आहे. समनापुर महसूल मंडळात कोकणगाव कोंची, मांची, शिवापूर, पोखरी हवेली, कुरण, वडगाव पान, माळेगाव हवेली सुकेवाडी, खांजापुर या गावांचा समावेश आहे.

संगमनेर हा विस्ताराने मोठा तालुका असला तरी शहर मध्यवर्ती ठिकाणी आहे. तहसीलदार प्रांताधिकारी व इतर सुसज्य कार्यालय येथे करून ठेवली आहेत. असे असताना शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे. तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारले जाईल. -माजी मंत्री बाळासाहेब थोरात

या संपूर्ण प्रकाराची आपण माहिती घेत आहोत. संगमनेर खुर्द मंडळातील गावे जर अश्वीला जोडली जाणार असतील तर तेथील नागरिकांची गैरसोय होणार आहे हे वास्तव आहे. आपल्यावर तालुक्यातल्या जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय होईल. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी आपण चर्चा करू आणि निश्चितपणे मार्ग काढू. -आमदार अमोल खताळ.