परभणी : जिल्हाधिकार्यांनी पाथरी येथे पालिकेच्या सभागृहात भूमिअधिग्रहण संदर्भात बोलावलेल्या बैठकीत वादाची ठिणगी पडल्याने तिचा भडका लगेचच उडाला. बैठक आटोपून सर्वजण बाहेर पडल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आलोक चौधरी यांना मारहाण केली अशी तक्रार दाखल झाल्यावरून बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चार जणांविरूध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच या प्रकरणी बाबाजानी यांच्यावतीनेही एका कार्यकर्त्याने अशाच स्वरूपाची तक्रार दिल्याने आलोक चौधरी यांच्यासह चार जणांविरूध्द त्याच कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय संघर्ष सुरु असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाची धार आता आणखी तीव्र झाली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने पाथरीत दुपारपासून तणाव निर्माण झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज बुधवारी (दि.१३) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पाथरी नगरपालिकेच्या सभागृहात साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूमिअधिग्रहणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत पाथरी येथील विविध पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. बैठकीतच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. समर्थकांसह आलेल्या बाबाजानी यांनी आपणास मारहाण केली अशी तक्रार आलोक चौधरी यांनी पाथरी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून बाबाजानी दुर्राणी, तबरेज खान दुर्राणी, शेहजाद खान बख्तीयार खान, हमेद खान शेरखान यांच्याविरूध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बाबाजानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले.
याप्रकरणी आधीच्या गुन्ह्यातील फिर्यादीविरोधात तक्रार देण्यात आली. बाबाजानी यांच्या गटाच्यावतीने पठाण हमीद खान शेरखान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आसेफ खान शेरगुल खान, सातखान आसेफ खान, युनूस कुरेशी आलोक चौधरी यांच्या विरोधात मारहाणीचाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजानी हे सध्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात आहेत तर त्यांचे कट्टर स्थानिक विरोधक शिवसेनेचे स्थानिक नेते सईद खान हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. दोघांमध्ये विधानसभा निवडणूकीच्याही आधीपासून राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यातूनच परस्परांविरोधात सातत्याने तक्रारी आणि कुरघोड्या चाललेल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष तीव्र झाला आहे.