उपमुख्यमंत्रीपदच घटनाबाह्य़ असल्याचा दावा करून विधान परिषदेतील विरोधी पक्षांनी गोंधळ घालत त्यांनी सभात्याग केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा परिचय करून देत असताना उपमुख्यमंत्री हे पद घटनात्मक पद नसल्याने अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून परिचय करून देणे नियमबाह्य़ आहे, असा आक्षेप विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी घेतला. दोघांनीही जुन्या घटनांचा आधार घेत काही काळ उपमुख्यमंत्र्याचा परिचय रोखून धरला.
‘कौल शकधर’चा आधार घेत व संसदेच्या नियमांचे दाखले देत अजित पवार यांना सभागृहाचे नेते म्हणून देखील निवडता येणार नाही, असेही पाटील म्हणाले. वर्ष १९९१ पासून पंतप्रधान हे लोकसभा सभागृहाचे नेते नसल्यामुळे त्या ठिकाणी अन्य मंत्र्यांची सभागृह नेते म्हणून निवड केली गेली. आजही लोकसभेत सभागृहाचे नेते हे पंतप्रधान नसून सुशीलकुमार शिंदे असल्याची आठवण पाटील यांनी करून दिली. अजित पवार यांची सभागृह नेते म्हणून असलेली नियुक्ती घटना व कार्यपद्धती विरोधी आहे. त्यामुळे आज सभागृह नेत्याच्या नावाची घोषणा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.  त्यास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे सभागृहात पहिल्याच दिवशी जवळपास अर्धातास गोंधळ सुरू होता.
सभापतींनी पूर्वी अशा पद्धतीची निवड झालेली आहे. एवढाच खुलासा करून अजित पवार यांचा परिचय करून देण्यास संसदीय कार्यमंत्र्यांना परवानगी दिली. परवानगी देताच विरोधी पक्षाच्या सर्व सभासदांनी सभात्याग केला.