केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील मृणाली जोशी हिला ३६ वे, तर विनायक नरवडे याला ३७ वे स्थान मिळाले आहे. विनायक महामुनी हा ९५ व्या स्थानावर आहे. राज्यातील साधारण चार ते पाच उमेदवारांची निवड पहिल्या शंभरात झाली आहे, तर साधारण एकूण निवड झालेल्या उमेदवारांमध्ये राज्यातील साधारण ६० ते ७० उमेदवार आहेत. याच परीक्षेत बोरीवलीस्थित (पूर्व), मुळगाव कणकवली वरवडे-फळसेवाडीची कोकणकन्या नयोमी दशरथ साटम हिने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल भाजपा आमदार नितेश राणे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बोरीवलीस्थित (पूर्व), मुळगाव कणकवली वरवडे-फळसेवाडीची कोकणकन्या नयोमी दशरथ साटम हिने UPSC परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले, तिच्या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली. आय.ए.एस. झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.” असं आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

तसेच, “सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईच्या अर्थशास्त्र विभागासाठी अतिशय अभिमानाचा क्षण. आमच्या माजी विद्यार्थी, नयोमी दशरथ साटम यांनी प्रतिष्ठित अशा यूपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केले असून, त्यांचा ऑल इंडिया रँक १६२ आहे. नयोमीने २०१९ मध्ये पदवी प्राप्त केली असून, पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या महिला विकास कक्षाच्या संयोजिका आदिती सावंत यांनी देखील दिली आहे.

नालासोपार्‍याची खिल्ली उडवणार्‍या कपिल शर्माला, यूपीएससी उत्तीर्ण सुर्यभान यादवने दिले उत्तर, म्हणाला…

नयोमी साटम हिचे प्राथमिक शिक्षण दहिसर, मुंबई येथे झाले. त्यानंतर तिने सेंट झेवियर्समधून अर्थशास्त्र विषयातून २०१९ मध्ये पदवी मिळवली. यूपीएससी परीक्षा देण्याचे तिने अगोदरच निश्चत केले होते, त्यामुळे पदवी मिळवताच तिने बंगळुरू येथे यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी क्लास सुरू केला. मात्र, काही महिन्यातच करोना महामारीमुळे तिला पुन्हा मुंबईला परतावं लागलं. तरी तिने अभ्यासात खंड पडू दिला नाही, चिकाटीने अभ्यास केला. २०२० मध्ये तिने पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली व ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. तिचा देशपातळीवर १६२ वा क्रमांक आला. आता दीड वर्षाच्या मसुरी येथील प्रशिक्षणानंतर तिला राज्य व जिल्हा दिला जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc congratulations from nitesh rane to konkankanya naomi dashrath satam who achieved success in the first attempt msr
Show comments