मागील लेखातून आपण म्हैसूर राज्याची निर्मिती आणि टिपू सुलतानबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण १८ व्या शतकातील मराठा राज्याबाबत जाणून घेऊया. मराठा सत्तेचा कालखंड हा दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा पेशव्यांचा. मराठा राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. १८ व्या शतकात पेशव्यांनी मराठा राज्याचा विस्तार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुघलांच्या उत्तरार्धात त्यांना सर्वाधिक आव्हान देणारे कोणते राज्य असेल, तर ते मराठा राज्य होते. मुघल साम्राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची क्षमता मराठा राज्यात होती. मात्र, मराठा सरदारांमधील मतभेदांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ४

इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी शाहू राजे यांची कैदेतून सुटका केली. मात्र, त्यानंतर शाहूराजे आणि महाराणी ताराबाई यांच्यात यादवी युद्ध सुरू झाले. राजाराम महाराज यांच्या निधनानंतर म्हणजेच इ.स. १७०० पासून महाराणी ताराबाई यांनी पुत्र शिवाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. शाहूराजे आणि महाराणी ताराबाई यांच्यातील संघर्षातून पुढे मराठ्यांच्या राज्यात राज्यकारभाराची एक नवीन पद्धत उदयास आली आणि पेशव्यांचा कालखंड सुरू झाला. शाहू राजांनी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवेपदी नियुक्ती केली.

बाळाजी विश्वनाथ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठा राज्यातील एक कनिष्ठ अधिकारी म्हणून केली होती. आपले राजनैतिक कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर ते उच्च अधिकारी पदापर्यंत पदोन्नत होत गेले. त्यांनी अनेक मराठा सरदारांना शाहू राजांच्या बाजूने वळवले. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मुघलांमधील अंतर्गत संघर्षाचा पूरेपूर फायदा घेतला. त्यांनी दख्खनमधील सहा राज्यांची चौथाई आणि सरदेशमुखी शाहू राजांना मिळवून दिली. तसेच इ.स. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने फारूख सियारला पदच्युत करण्यासाठी सय्यद बंधूंना मदत केली होती.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ३

महसूलवाढीच्या दृष्टीनेही बाळाजी विश्वनाथ यांनी अनेक सुधारणा केल्या. दख्खनमधील चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी त्यांनी मराठा सरदारांची नेमणूक केली. या वसुलीतील मोठी रक्कम मराठा सरदारांना स्वत:कडे ठेवण्याची परवानगी त्यांनी दिली. ही पद्धत पुढे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली. इ.स. १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history rise of new state after mughal declined maratha state spb