संजय निरुपम यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीने ही उमेदवारी त्यांना दिली नाही. त्यामुळे संजय निरुपम प्रचंड नाराज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या विरोधातही बोलत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आता संजय निरुपम हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीतूनही नाव काढलं
संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्याआधी स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव काढण्यात आलं. संजय निरुपम यांच्या जवळच्या एका व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली आहे की संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मुंबईतून लोकसभा लढवायची आहे. ती जागा एकनाथ शिंदे हे त्यांना देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस वगैरे काहीही न बजावता थेट त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. काँग्रेसने माझ्यावर कारवाई करण्यासाठी स्टेशनरी वाया घालवू नये अशी प्रतिक्रियाही संजय निरुपम यांनी दिली होती. आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंचा उमेदवार खिचडी चोर, आम्ही..”, संजय निरुपम यांची बोचरी टीका
एक काळ असाही होता जेव्हा संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक होते. त्याच काळात ते शिवसेनेतही होते. मात्र २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उत्तर भारतीय फेरीवाल्यांचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन विजय मिळवला होता. संजय निरुपम हे दोनदा राज्यसभेचे खासदार होते. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी उत्तर मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं.