ग्रामीण भागातील रस्ते चांगले असले पाहिजेत याकरिता रस्त्याचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. सुनील तटकरे यांनी केले.
 तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तळा, माणगाव, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांच्या पंचायत समितीच्या आमसभांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एस. के. जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, माजी आमदार अशोक साबळे, अॅड. राजीव साबळे, माणगाव पंचायत समितीच्या सभापती अलका केकाणे, प्रांताधिकारी (माणगाव) डॉ. श्याम घोलप, प्रांताधिकारी (महाड) रवींद्र हजारे, तहसीलदार श्रीमती माने, गटविकास अधिकारी चिनके आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले, आरोग्य, वीज वितरण कंपनी तसेच इतर विभागांतील रिक्त पदांची माहिती सादर करावी. माणगाव हे महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांगली सेवा द्यावी, असे सांगून ते पुढे म्हणाले, दवाखान्यात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. कोणत्याही रुग्णास औषधोपचारापासून वंचित ठेवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. गरोदर मातांची तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार देण्यात यावेत. २९ ते ३० डिसेंबर २०१२ रोजी आरोग्यविषयक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा उत्तम प्रकारे दिल्या पाहिजेत. शिवकालीन योजनेवर दुरुस्तीसाठीच्या खर्चाची माहिती सविस्तर तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तटकरे यांनी आरोग्य, वीज, पाणीपुरवठा, रस्ते याविषयीच्या समस्या जाणून घेतल्या व याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीस पंचायत समितीचे सदस्य, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा